
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत मोठी हालचाल सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत महत्त्वाचे दावे केले. सुनेत्रा काकींना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बसवण्यासाठी बहुतांश आमदारांनी पाठिंबा दिला होता, मात्र काही मोजक्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी त्या प्रस्तावावर सह्या केल्या नव्हत्या, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. कोण होते ते आमदार आणि पदाधिकारी, असा थेट सवाल त्यांनी केला. रोहित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांशी बोलल्यास संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. सुनेत्रा काकींना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी सर्वांनी सह्या केल्या नव्हत्या. त्यांच्या माहितीनुसार, सुमारे 35 आमदारांनी या प्रस्तावावर सह्या केल्या होत्या. त्या 35 आमदारांपैकी कुणालाही विचारले तर संपूर्ण माहिती समोर येईल, असे त्यांनी सांगितले. बहुतांश पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा काकींना पाठिंबा दिला होता, पण ज्यांनी सह्या केल्या नाहीत त्यांनी का टाळाटाळ केली, हे शोधण्याचा विषय असल्याचे त्यांनी नमूद केले. येत्या 26 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईल, अशी माहिती काही दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी दिली होती. मात्र त्याआधी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे पक्ष ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे आरोप झाले होते. या साऱ्या घडामोडींमुळे पक्षात नेमके काय सुरू आहे, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्या वक्तव्याला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणावरही भाष्य केले. मला आज विलिनीकरणावर जास्त बोलायचे नाही, असे सांगून त्यांनी दोन राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू असल्याचे सूचित केले. मात्र अजित दादा आज हयात नसल्याने त्यावर सविस्तर बोलणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. तरीही दोन्ही गटांमध्ये काही पातळीवर संवाद सुरू होता, हे त्यांनी स्पष्ट केले. रोहित पवार यांच्या मते, जर दोन राष्ट्रवादी एकत्र आले असते तर अजित दादांना नेतृत्वात काही बदल करायचे होते. प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहरा असावा, अशी त्यांची इच्छा होती. त्या अनुषंगाने अमोल कोल्हे यांच्या नावाचा प्रस्तावही चर्चेत होता. त्यामुळेच अमोल कोल्हे अनेक बैठकींना उपस्थित राहत होते. त्या दृष्टीने चर्चेचे सत्र सुरू होते, असे रोहित पवार यांनी सांगितले. दादांची भूमिका राजकीय नव्हती, तर भावनिक अजित दादांची भूमिका ही केवळ राजकीय नव्हती, तर भावनिक होती, असेही त्यांनी नमूद केले. दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र यावेत, कुटुंब एकत्र यावे, अशी त्यांची इच्छा होती. राजकीय गणितांपेक्षा नातेसंबंध आणि भावनिक बंध अधिक महत्त्वाचे होते, असा दावा रोहित पवार यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत चर्चांबाबत नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्व, विलिनीकरण आणि अध्यक्षपदाच्या निवडीभोवती निर्माण झालेल्या या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 35 आमदारांच्या सह्या, काहींचा विरोध, आणि पुढील निवडीची शक्यता यामुळे पक्षातील समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाल्याचे दिसते. आगामी काळात या प्रश्नांची उत्तरे समोर येतात का, आणि पक्षात नेमकी कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.