सुधारित विकास आराखड्याप्रमाणे पैठणमधील अतिक्रमणे हटवणार:2016-17 च्या विकास आराखड्यानुसार होणार कारवाई‎

सुधारित विकास आराखड्याप्रमाणे पैठणमधील अतिक्रमणे हटवणार:2016-17 च्या विकास आराखड्यानुसार होणार कारवाई‎
पैठण शहरातील मुख्य रस्ते आणि अतिक्रमणग्रस्त जागा मोकळ्या करण्यासाठी नगरपालिकेने मोठी कारवाई हाती घेतली आहे. २०१६- १७ च्या सुधारित विकास आराखड्यानुसार रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांनी दिली. शहरात एक हजाराहून अधिक अतिक्रमणे असल्याचा अंदाज असून सध्या जी अतिक्रमणे काढली जात आहेत, ती नाथषष्ठीच्या पार्श्वभूमीवर तर इतर अतिक्रमणे नाथषष्ठीनंतर काढली जातील. शहराचा २०१६-१७ चा सुधारित विकास आराखड्याचा नकाशा डिसेंबर २०१६ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. या नकाशात मुख्य रस्त्यांची रुंदी स्पष्टपणे दर्शवण्यात आली आहे. हा आराखडा नगर परिषद कार्यालय तसेच नगरविकास विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे नागरिकांच्या अवलोकनासाठी ठेवण्यात आला होता. नागरिकांकडून आक्षेप मागवण्यात आले होते; मात्र जनजागृतीअभावी केवळ शंभरच्या आसपास आक्षेप नोंदवले गेले. त्यावर सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांचे बेकायदा पार्किंग आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. विशेषतः बाजारपेठ, बसस्थानक परिसर आणि प्रमुख चौकांमध्ये नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची निर्धारित रुंदी अमलात आणल्यास वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल. लहान अतिक्रमणांवर हातोडा सध्या शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढली जात आहेत. यात व्यापारी स्वखुशीने अतिक्रमणे काढून सहकार्य करत आहेत. मात्र प्रशासनाकडून जो विकास आराखडा तयार करण्यात आला आहे, त्याची मार्किंग करण्यात आली असल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. तर, सुधारित विकास आराखड्यानुसार ज्या ठिकाणची अतिक्रमण काढली जाणार त्याची मार्किंग सुरू आहे. नागरिकांनी स्वत: अतिक्रमणे काढून घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांनी केले आहे.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart