
लातूरचे आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या १६ दिवसीय महाशिवरात्री यात्रेस उत्साहात सुरुवात झाली आहे. मराठवाडा आणि सीमावर्ती भागात प्रसिद्ध असलेल्या या यात्रेची पारंपरिक सुरुवात वीरशैव तेली समाजाच्या वतीने ‘मानाच्या काठीचे’ पूजन आणि गंगाजल अभिषेकाने करण्यात आली. समाजाचे अध्यक्ष किशोर भुजबळ यांच्या हस्ते मानाच्या काठीचे शास्त्रोक्त पूजन झाले. प्रथेनुसार समाजातील महिला भगिनींनी गंगेच्या पाण्याचे कलश डोक्यावर घेऊन वाजत-गाजत मिरवणूक काढली. मंदिरात हनुमंत भुजबळ, गुंडेराव चिंदे, विलास ब्याकुडे, अनिल क्षीरसागर व श्रीकांत म्हेत्रे यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वरास जलाभिषेक करण्यात आला. माहेश्वरी समाज महिला भजनी मंडळाच्या वतीनेही वाजंत्र्यांसह मिरवणूक काढून मानाची काठी मंदिरात अर्पण करण्यात आली. मंदिर कमिटीचे विश्वस्त बाबासाहेब कोरे यांनी मानाच्या काठीचे स्वागत केले. या सोहळ्याला वीरशैव तेली समाजाचे संचालक, ज्येष्ठ नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिढ्यानपिढ्या जपलेला वारसा, भक्तिमय वातावरणात मिरवणूक श्री सिद्धेश्वर यात्रा म्हणजे लातूरच्या सांस्कृतिक वैभवाचा आरसा आहे. वीरशैव तेली समाजाने गेल्या अनेक वर्षांपासून गंगाजल अभिषेक आणि मानाच्या काठीची परंपरा अत्यंत निष्ठेने जपली आहे. अमावास्येच्या मुहूर्तावर निघणारी ही मिरवणूक आणि भक्तिमय वातावरण भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. या १६ दिवसांच्या यात्रेत लातूरकर आपल्या ग्रामदैवताच्या चरणी नतमस्तक होतात, ज्यामुळे संपूर्ण शहर शिवमय होऊन जाते.