– rat१८p२६.jpg-
२६O२५४७९
दापोली ः तालुक्यातील केळशी येथील ज्ञानविकास मंडळाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना डॉ. प्रशांत परांजपे. सोबत केदार जोशी, शीला कोठारी, सुभाष लाड, सुयोग खरे, भरत वर्तक, सुजाता धर्माधिकारी आदी उपस्थित होते.
—-
संतसाहित्याचा विसर पडल्यानेच पर्यावरणाचा ऱ्हास
डॉ. प्रशांत परांजपे ः साहित्य, पर्यावरण अन् युवापिढी विषयावर व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १९ : ‘संतसाहित्यातील शिकवणीचा विसर पडल्यामुळे आज पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. मराठी साहित्य आणि पर्यावरण यांच्या संवर्धनासाठी युवापिढीने सक्षमपणे पुढे येणे ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन डॉ. प्रशांत परांजपे यांनी केले.
दापोली तालुक्यातील ज्ञानविकास मंडळ, केळशी या वाचनालयाच्या ५०व्या वर्धापनदिनानिमित्त ‘साहित्य, पर्यावरण आणि युवापिढी’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि समर्थ दासबोधाच्या पूजनाने करण्यात आले. या प्रसंगी डॉ. परांजपे म्हणाले, ‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणेच ‘निसर्गवाचन’ हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे. आपल्या मातृभाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे, त्याचे रक्षण करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच निसर्गाची अभिजातता टिकवून ठेवणेही गरजेचे आहे. यासाठी युवकांनी केवळ अभ्यास न करता कृतिशील होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यवाह केदार जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर ग्रंथालयाच्या अध्यक्षा शीला कोठारी यांनी अध्यक्षीय समारोप केला. या प्रसंगी उपाध्यक्ष सुभाष लाड, सुयोग खरे, भरत वर्तक, सल्लागार सुजाता धर्माधिकारी उपस्थित होते. या वेळी करंदीकर, बोहरा, माजी ग्रंथपाल अश्विनी जोशी, रोहिणी केतकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रंथपाल स्मिता महाजन, सहाय्यक स्वप्नाली मिसाळ, रश्मी करंदीकर, दापोली तालुका वाचनालयाच्या ग्रंथपाल नेत्रा करमकर यांच्यासह केळशीतील वाचक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—-
लिळाचरित्रातील दिले दाखले
व्याख्यानादरम्यान डॉ. परांजपे यांनी १२व्या शतकातील ‘लिळाचरित्रा’पासून ते संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव आणि गाडगे महाराज यांच्या पर्यावरणविषयक विचारांचे दाखले दिले. ते म्हणाले, ‘आम्ही मंदिरात ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ म्हणतो; मात्र त्याचा अंगीकार करायला विसरलो आहोत. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात पंचमहाभूतांच्या संवर्धनाचा संदेश दिला आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘आज्ञापत्रा’तील पर्यावरण नीती जर युवकांनी अमलात आणली तरच भविष्यकाळ सुसह्य होईल.’