शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत:कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती, शेतीतील तंत्रज्ञानाचीही दिली माहिती

शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत:कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती, शेतीतील तंत्रज्ञानाचीही दिली माहिती
शेतीच्या कामांमध्ये महिला भगिनी अग्रेसर आहेत. या महिलांचे शेतीमधील श्रम कमी करण्यासाठी संशोधन होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची प्रगती ही कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या वाणांमुळेच आहे. कृषी विभागांतर्गत आपण ५० हून अधिक शेतकरीभिमुख योजना राबवत आहोत. शेतकऱ्यांची काळजी घेणे व त्यांचे हित जपणे हे आमचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व आत्मा अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने फुले कृषी महोत्सव २०२६ थेट पीक प्रात्यक्षिके, शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन मंत्री भरणे बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, तुषार पवार, माजी आमदार प्राजक्त तनपुरे, डॉ. इंद्र मणी, डॉ. शरद गडाख आदी उपस्थित होते. मंत्री भरणे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सवलती कशा देता येतील यावर आम्ही भर देत आहोत. साडेसात हॉर्सपॉवरपर्यंतच्या मोटरीचे बिल आपण माफ केलेले आहे. यासाठी शासनाने ३१ हजार कोटी रुपये निधी दिला आहे. कृषीच्या योजना व कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. यासाठी कृषीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आपण सुरू केलेला आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा आम्हाला माहित आहेत. पेरणीपासून ते विपणनापर्यंत शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्यावर मदत कशी करता येईल यावर आम्ही भर देत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषिदर्शनी-२०२६ व मफुकृवि कॅलेंडर-२०२६ या प्रकाशनांचे विमोचन करण्यात आले. सविता नालकर व स्वाती शिंगाडे या प्रगतशील महिला शेतकऱ्यांचा त्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रशस्तीपत्रक देत सन्मान करण्यात आला. अखिल भारतीय समन्वीत फळ संशोधन योजनेला उत्कृष्ठ संशोधन प्रकल्पाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. भरत पाटील व योजनेच्या प्रमुख डॉ. सुमती दिघे तसेच आर्किटेक्ट रोहन मांडे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रदर्शनादरम्यान कृषी मंत्र्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यानंतर त्यांनी भाजीपाला प्रकल्पाच्या थेट पीक प्रात्यक्षिकांना भेट दिली. उमेद अभियान अंतर्गत बचतगटांच्या स्टॉल्सला शेतकरी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भाजीपाला सुधार प्रकल्प, कडधान्य सुधार प्रकल्प व ज्वारी सुधार प्रकल्प येथील थेट पीक प्रात्यक्षिकांना शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart