Wednesday, March 18, 2026
HomeNewsMartahiशिवाजी महाराजांच्या स्वराज्याला नैतिक अधिष्ठानाचा भक्कम आधार: डॉ. कोल्हे:पुणे विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त खासदार...

शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला नैतिक अधिष्ठानाचा भक्कम आधार: डॉ. कोल्हे:पुणे विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त खासदार अमोल कोल्हे यांचे प्रतिपादन

शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला नैतिक अधिष्ठानाचा भक्कम आधार: डॉ. कोल्हे:पुणे विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त खासदार अमोल कोल्हे यांचे प्रतिपादन
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पाया नैतिक अधिष्ठानावर आधारित असल्याचे प्रतिपादन केले. शुक्रवारी इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलातील स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात हे व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी होते, तर प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी प्रास्ताविक केले. व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी कुलसचिव डॉ. चारुशीला गायके, अधिष्ठाता प्रा. डॉ. संजय तांबट, परीक्षा संचालक प्रा. डॉ. प्रभाकर देसाई यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. कोल्हे यांनी स्पष्ट केले की, शिवाजी महाराजांचे स्वराज्य केवळ राजकीय सत्ता नव्हते, तर ते लोककल्याण, न्याय, धर्मनिरपेक्षता आणि नैतिक मूल्यांवर आधारित लोकाभिमुख राज्य होते. सामान्य जनतेच्या हिताचा विचार करणारी प्रशासन व्यवस्था उभी करून त्यांनी आदर्श राज्यकारभाराचा वस्तुपाठ घालून दिला. महाराजांचे विचार व मूल्ये आजही समाजासाठी मार्गदर्शक ठरतात, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी एकतर्फी भाषण न करता विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. ऐतिहासिक संदर्भांच्या आधारे व प्रेरणादायी विचारांच्या माध्यमातून त्यांनी महाराजांचे जीवन व कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, कर्तव्यभावना व नेतृत्वगुणांची जाणीव निर्माण झाली. महाराजांच्या जीवनकार्याचा व्यापक दृष्टिकोनातून अभ्यास करून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. पर्यावरण व शेतकरीविषयक प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी महाराजांच्या दूरदृष्टीपूर्ण राज्यकारभारावर प्रकाश टाकला. महाराजांच्या आज्ञापत्रात “झाडाला लेकराप्रमाणे वाढवावे” असा उल्लेख असून, आंबा, फणस, काजू यांसारखी झाडे तोडू नयेत, असा त्यांचा आदेश होता. यावरून महाराजांची पर्यावरणाबाबतची भूमिका केवळ संरक्षणापुरती मर्यादित नसून संवर्धनावर आधारित होती, हे स्पष्ट होते. तसेच, “शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागणार नाही” अशी आज्ञा देत महाराजांनी शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण केले आणि त्यांच्या कल्याणासाठी जिजियासारखा कर रद्द केला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. महाराजांनी राज्यकारभार करताना स्वतःची क्षमता ओळखणे, कमकुवत बाजू समजून घेणे, स्पष्ट ध्येय निश्चित करणे आणि दूरदृष्टी ठेवणे ही सूत्रे वापरली. हीच तत्त्वे अंगीकारून युवकांनी जीवनात वाटचाल करावी, असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना केले.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments