शिवरायांनी स्वराज्यासाठी 'नरदुर्ग' उभारले:प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे शिवजयंती उत्सवात प्रतिपादन

शिवरायांनी स्वराज्यासाठी 'नरदुर्ग' उभारले:प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे शिवजयंती उत्सवात प्रतिपादन
छत्रपती शिवाजी महाराजांनी गिरिदुर्ग आणि जलदुर्गांसोबत स्वराज्यासाठी लढणारे ‘नरदुर्ग’ (माणसे) उभारले, असे मत इतिहास अभ्यासक, लेखक व शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले. सुवर्णयुग तरुण मंडळाने आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवात ते बोलत होते. प्रा. बानगुडे पाटील म्हणाले की, क्रांतिकारकांनी आणि महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचले. त्यामुळे त्यांनी क्रांती घडवताना शिवरायांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले. पराक्रमाचा धडा गिरवत शिवरायांनी रयतेत विश्वास निर्माण केला. अनेक राजांनी किल्ले बांधले, पण स्वराज्यासाठी लढणारी आणि मरणारी माणसे घडवणारे केवळ छत्रपती शिवाजी महाराज होते. बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोरील जय गणेश प्रांगण येथे सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शिवजयंती निमित्त या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. समुद्रामार्गे येणारे अरबी लोक जनतेवर अत्याचार करत होते आणि माणसांना गुलाम बनवून व्यापार करत होते. याचा महाराजांना संताप होता. त्यामुळे त्यांनी स्वराज्याच्या आरमाराला अरबी चाच्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले. अरबांची गलबते कोकणात आल्यावर मराठ्यांच्या आरमाराने त्यांच्याशी लढा दिला आणि मस्कतपर्यंत त्यांचा पाठलाग केला. तेथून १७५ अरबांना कैद करून महाराजांसमोर आणण्यात आले. महाराजांनी त्यांना वासोट्याच्या किल्ल्यात (व्याघ्रगड) कैद करून शिक्षा दिली. ही महाराजांची दूरदृष्टी होती, असे प्रा. बानगुडे पाटील यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांमध्ये स्वातंत्र्याचे बीज पेरले, स्वराज्य उभे करण्याची उर्मी निर्माण केली. त्यांनी आक्रमकांच्या अन्याय व अत्याचारापासून रयतेला मुक्त केले आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आत्मविश्वासही दिला. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या पराक्रमाला विसरलो, म्हणूनच इंग्रजांना १५० वर्षे राज्य करता आले, असेही त्यांनी सांगितले. शिवजयंतीच्या दिवशी, गुरुवारी (१९ फेब्रुवारी) दुपारी ४ वाजता पारंपरिक वाद्यवादन होणार आहे. सायंकाळी ७ वाजता शिवसाई प्रतिष्ठान ट्रस्ट निर्मिती गणेश लोणारे व सहकारी प्रस्तुत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील ‘मृत्युंजय’ हे धगधगते महानाट्य सादर होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी केले आहे.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart