
प्रतिनिधी | सिडको मुंबई-आग्रा महामार्गावरील राणेनगर येथील उड्डाणपुलावरून खोदकामामुळे कंटेनर उलटून थेट समांतर रस्त्यावर कोसळला. बुधवारी (दि. १८) पहाटे हा भीषण अपघात घडला. मुंबईहून धुळ्याच्या दिशेने जाणारा भरधाव कंटेनर पहाटे राणेनगर भागातून जात होता. येथे महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, संबंधित ठिकाणी कामाबाबतचे सूचना फलक चालकाच्या लक्षात न आल्याने त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक पुलावरून समांतर रस्त्यावर कोसळला. पहाटेची वेळ असल्याने महामार्गावर आणि समांतर रस्त्यावर वाहतूक कमी होती, त्यामुळे अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सकाळी १० वाजता क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रक रस्त्यावरून बाजूला हटवण्यात आला. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती, मात्र पोलिसांनी वाहतूक पूर्ववत केली. या अपघातामुळे महामार्गावर सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कामाच्या ठिकाणी स्पष्ट दिसणारे सूचना फलक आणि रिफ्लेक्टर्स लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.