राज्यसभेवर कोण? उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाणार का?:संजय राऊत यांनी मांडले गणित; आदित्य ठाकरेंच्या भूमिकेनंतर शरद पवारांचे थेट नाव टाळले

राज्यसभेवर कोण? उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाणार का?:संजय राऊत यांनी मांडले गणित; आदित्य ठाकरेंच्या भूमिकेनंतर शरद पवारांचे थेट नाव टाळले
राज्यसभेच्या एका जागेसाठी आमच्याकडे आवश्यक ते संख्याबळ आहे आणि त्या जागेवर कोणाला संधी द्यायची याचा निर्णय महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मिळून घेतील, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मांडली. ते सकाळी प्रसार माध्यमांशी बोलत होते. राऊत म्हणाले की, राज्यसभेच्या जागेबाबत कोणताही घाईगडबडीचा निर्णय होणार नाही. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर एकमताने उमेदवार निश्चित केला जाईल. आमच्याकडे संख्याबळ आहे, त्यामुळे जागा जिंकण्याची ताकद आहे. मात्र, प्रतिनिधीत्व कोण करणार हे तिन्ही पक्षांच्या सामंजस्यातून ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. राऊत म्हणाले की, राज्यसभेसाठी महाविकास आघाडीला एकच जागा आहे आणि तेवढे संख्याबळ आमच्याकडे उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि अस्मितेसाठी काम करणारे व्यक्तिमत्व कोणते, हे तिन्ही पक्ष एकत्र बसून ठरवतील. निर्णय एकमतानेच होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी रोटेशनचा मुद्दा पुढे करत यावेळी राज्यसभेवर शिवसेनेचा खासदार असावा, असे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे; मात्र अंतिम निर्णय सामूहिक चर्चेनंतरच घेतला जाईल. शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत, हे मान्य करतानाच राऊत यांनी सांगितले की काँग्रेस आणि शिवसेनेचे काही नेते राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे सर्व पक्षांच्या राजकीय गणितांचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल. शरद पवार आणि त्यांच्या पक्षाची भूमिका काय असेल, यावरही अनेक बाबी अवलंबून असतील. त्यामुळे आत्ता कुणाचे नाव निश्चित झाले आहे असे म्हणणे योग्य नाही, असे त्यांनी नमूद केले. तीन पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी योग्य असा उमेदवार ठरवावा लागेल, असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांचे विधान परिषदेत जाणे कठीण दरम्यान, विधान परिषदेवर उद्धव ठाकरे यांना पाठवण्याबाबतही चर्चा सुरू आहे. काही ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे विधान परिषदेत जाणे कठीण असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर राऊत यांनी स्पष्ट भूमिका घेतली. ते म्हणाले की उद्धव ठाकरे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख आहेत. त्यांच्या विधान परिषदेत जाण्यात कोणतीही अडचण नाही. राज्यसभा आणि विधान परिषद या दोन्ही बाबतीत एकत्रित निर्णय घेतला जाईल. काँग्रेसचा निर्णय प्रामुख्याने दिल्लीत घेतला जातो, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे निर्णय मुंबईत होतात, असेही त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे विधान परिषदेत जावेत, ही सर्वांचीच इच्छा संख्याबळाचे गणित मांडताना राऊत म्हणाले की शिवसेनेकडे 20 मते आहेत, काँग्रेसकडे 16 आणि शरद पवारांच्या पक्षाकडे 10 मते आहेत. इतर घटक पक्षांची भर घातल्यास एकूण संख्याबळ 50 च्या आसपास जाते. विजयासाठी 37 मतांची आवश्यकता आहे, त्यामुळे महाविकास आघाडीकडे पुरेसे बळ आहे. विधान परिषदेसाठी काँग्रेसलाही आमदार पाठवण्याची इच्छा असल्याच्या चर्चा आहेत; मात्र उद्धव ठाकरे विधान परिषदेत जावेत, ही सर्वांचीच इच्छा असल्याचे राऊत यांनी सांगितले. पुढील काही दिवसांत तिन्ही पक्ष बसून अंतिम निर्णय जाहीर करतील, असे संकेत त्यांनी दिले. राऊत यांची सावध भूमिका महाविकास आघाडीत प्रत्येक पक्षाला संधी मिळावी अशी अपेक्षा असते, हेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे अंतिम निर्णय घेताना सर्वांच्या भावना आणि राजकीय समीकरणांचा विचार केला जाईल, असे राऊत म्हणाले. राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीतल्या चर्चांना आता वेग येण्याची शक्यता आहे. या आधी संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांचे नाव घेत त्यांना आघाडीच्या वतीने राज्यसभेसाठी पाठवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, आता राऊत यांनी सावध भूमिका घेत एकमताने निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेसची अट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे की, राज्यसभेच्या उमेदवारीबाबत निर्णय घेण्यापूर्वी सर्व घटक पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. दोन राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना नेमकी भूमिका काय असेल, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला तातडीने पाठिंबा देण्याऐवजी काँग्रेस ‘थांबा आणि पाहा’ अशी भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. जर शरद पवार यांच्या गटाचे विलिनीकरण अजित पवार यांच्या गटासोबत झाले, तर काँग्रेस वेगळा विचार करू शकते, अशीही चर्चा आहे. राज्यसभा निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यसभेसाठी पाठिंबा देताना काँग्रेस विधानपरिषदेतील एका जागेवर दावा करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मोदीजी, इंग्लंड सुपर पॉवर नसेल, मात्र त्या देशात कायदा सर्वांसाठी समान ब्रिटनच्या राजघराण्याशी संबंधित घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ब्रिटनचे राजे चार्ल्स यांचे बंधू अँड्र्यू यांना सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तनाच्या आरोपांप्रकरणी अटक झाल्याच्या वृत्तानंतर राऊत यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी प्रिन्स अँड्र्यू यांचा फोटो शेअर करत लिहिले की, मोदीजी, इंग्लंड सुपर पॉवर नसेल, मात्र त्या देशात कायदा सर्वांसाठी समान आहे. पुढे त्यांनी, साउथ ब्लॉगहून सेवा तीर्थ येथे गेल्याने काही होणार नाही, असा टोला लगावला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा शब्दयुद्ध पेटण्याची शक्यता आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart