राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान:शरद पवारांसह दिग्गजांची मुदत संपणार, पार्थ पवारांची वर्णी लागण्याची शक्यता

राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान:शरद पवारांसह दिग्गजांची मुदत संपणार, पार्थ पवारांची वर्णी लागण्याची शक्यता
देशातील १० राज्यांमधील राज्यसभेच्या ३७ रिक्त होणाऱ्या जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचे बिगुल वाजवले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक ७ जागांचा समावेश असून, या जागांसाठी येत्या १६ मार्च २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. एप्रिल २०२६ मध्ये अनेक दिग्गज सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत चुरशीची ठरणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ५ मार्च असून ६ मार्च रोजी अर्जांची छाननी होईल. ९ मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. मतदान १६ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत होईल, तर त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत. महाराष्ट्रातून कोणते सदस्य निवृत्त होणार? महाराष्ट्र राज्याच्या कोट्यातून राज्यसभेवर प्रतिनिधित्व करणाऱ्या खालील ७ खासदारांची मुदत २ एप्रिल २०२६ रोजी संपत आहे. महायुतीची मजबूत स्थिती राज्य विधानसभेचे प्रभावी संख्याबळ सध्या २८६ इतके आहे. दोन जागा रिक्त असल्याने प्रत्यक्ष प्रभावी संख्या कमी असली तरी एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी ३७ आमदारांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीकडे भाजपचे १३१, शिंदेसेनेचे ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ४० असे मिळून २२८ आमदार आहेत. याशिवाय सात अपक्ष किंवा लहान पक्षीय आमदारांचा पाठिंबा मिळून हे संख्याबळ २३५ पर्यंत पोहोचते. या आकड्यांच्या आधारावर महायुतीचे किमान सहा उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात, असे स्पष्ट होत आहे. राजकीय वर्तुळात भाजप चार जागा लढवेल, तर शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना प्रत्येकी एक जागा मिळू शकते, अशी चर्चा रंगली आहे. पार्थ पवार रिंगणात उतरण्याची शक्यता दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनांनंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. त्यामुळे त्यांची राज्यसभेची जागा रिक्त झालेली आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांना संधी मिळण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त होत आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी उमेदवारी अर्ज प्रक्रियेपूर्वी राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हे आहेत. मविआसमोर एका जागेसाठी पेच? विरोधी महाविकास आघाडीचे संख्याबळ मर्यादित आहे. शरद पवार गटाचे १०, काँग्रेसचे १६ आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे २० असे मिळून ४६ आमदार आहेत. माकप आणि शेकापचे प्रत्येकी एक आमदार असल्याने एकूण संख्या ४८ पर्यंत जाते. ३७ मतांचा कोटा पूर्ण करून मविआचा एक उमेदवार निश्चित जिंकू शकतो; मात्र त्यानंतर उर्वरित मते अपुरी पडतात. समाजवादी पक्षाचे दोन आणि एमआयएमचा एक आमदार पाठिंबा देईल, तर एकूण १४ अतिरिक्त मते उपलब्ध होऊ शकतात; तरीही दुसरी जागा मिळविणे कठीण मानले जात आहे. त्यामुळे मविआकडून एकच उमेदवार उभा राहण्याची शक्यता अधिक आहे. त्या एका जागेसाठी ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात समन्वय साधणे महत्त्वाचे ठरणार आहे. या राज्यांमध्येही होणार निवडणूक महाराष्ट्राव्यतिरिक्त ओडिसा (३), तामिळनाडू (६), पश्चिम बंगाल (५), आसाम (३), बिहार (५), छत्तीसगड (२), हरियाणा (२), हिमाचल प्रदेश (१) आणि तेलंगणा (२) या राज्यांमध्येही राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. पुढील काही दिवसांत उमेदवारी अर्जांच्या प्रक्रियेमुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग येणार असून, महायुती आणि मविआ कोणाला संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart