
वसमत तालुक्यातील मुर्तीजापूर सावंगी शिवारात औंढा नागनाथ पोलिसांच्या पथकाने एका शेतात छापा टाकून जप्त केलेल्या १३.६९ क्विंटल अफूची किंमत तब्बल ४१ लाख रुपये असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी शुक्रवारी ता. २० एका शेतकऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याला राजस्थान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्हयात अवैध व्यवसाय, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. या शिवाय शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती घेऊन कारवाई केली जात आहेे तर आता अफूची व गांजाची विक्री करणाऱ्यांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत. दरम्यान, वसमत तालुक्यातील मुर्तीजापूर सावंगी शिवारात औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक जी. एस. रहिरे, उपनिरीक्षक दत्ता कानगुले, श्रीधर वाघमारे, अमोल इंगोले, जमादार रवीकांत हरकाळ, किशोर पारिसकर यांच्यासह पोलिसांच्या पथकाने गुरुवारी ता. १९ मुर्तीजापूर शिवारात छापा टाकून गुलाब जाधव (रा. बरगेवाडी, ता. औंढ) याच्या शेतातील अफू जप्त केला. शेतातील गव्हाच्या पिकालगत अफूची झाडे लावल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अर्धा एकर क्षेत्रातील अफूची झाडे उपटून पंचनामा केला त्यानंतर त्याचे मोजमाप केले असता तब्बल १३.६८ क्विंटल अफू असल्याचे स्पष्ट झाले. या अफूची किंमत तब्बल ४१ लाख रुपये आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक दत्ता कानगुले यांच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुलाब जाधव याच्या विरुध्द शुक्रवारी ता. २० गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, गुन्हे शाखेेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, या प्रकरणात गुलाब जाधव हा राजस्थान येथे गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्यावरून पोलिस अधिक माहिती घेत राजस्थान पोलिसांशी संपर्क साधला. राजस्थान पोलिसांनी गुलाब यास अजमेर जिल्हयात एका पोलिस ठाण्यांतर्गत ताब्यात घेतले आहे. त्यानुसार आता त्याला ताब्यात घेण्यासाठी औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे यांचे पथक रवाना झाले आहेत. दरम्यान, त्याच्या अधिक चौकशीनंतरच त्याने किती वर्षापासून अफू लागवडीचा व्यवसाय सुरु केला होता. अफूचे बियाणे कोठून मिळविले तसेच अफूची विक्री कोठे केली जाते या प्रश्ांची उत्तरे मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.