चिंचवड स्टेशन, ता. २० ः मुंबई-पुणे महामार्गालगत पिंपरी ते निगडीमधील स्मार्ट सिटीची कामे मुदत संपूनही काम झाली नसल्याने नागरिक नाराज आहेत. जागोजागी मोठमोठे पाइप, उखडलेले पेव्हिंग ब्लॉक, तुटलेले दिवे दिसतात. इतका पैसा खर्च करूनही काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. कोट्यवधी रुपये खर्चाचा प्रकल्प दोन वर्षानंतरही पूर्ण झाला नसल्याने कोंडी, पदपथांवरील अतिक्रमणे, पादचारी, सायकलस्वारांचा जीव मुठीत अशी स्थिती आहे.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते निगडी येथील भक्तीशक्ती चौकापर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करण्याचे नियोनज महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीत अधिकाऱ्यांनी केले. सुमारे ६० कोटी रुपयांची निविदा रक्कम असलेल्या या कामात सायकल ट्रॅक, पदपथ आणि सुशोभीकरण अशी तीन कामांचा एकत्रित मंजूर करण्यात आला. आतापर्यंत यावर १५ कोटी रुपये खर्च झाला आहे. १५ मार्च २०२४ रोजी हे काम ठेकेदारास देण्यात आले. पुढील महिन्यात मुदत संपणार असली तरी प्रकल्प दृष्टिपथात नाही.
आंबेडकर चौकातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मोरवाडीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौकापर्यंतच्या काम झाले आहे. तेथे अनेक नागरिकांनी चार चाकी वाहने उभी केली हेत. चौकाजवळील परिसरात थोडे काम बाकी आहे. मोरवाडी चौक ते एम्पायर इस्टेटच्या पुलापर्यंतच्या कामात अनेक ठिकाणी वाळूचे ढिगारे, अतिक्रमणे, उखडलेले पेव्हिंग ब्लॉक पडून आहेत. सेंट्रल पार्क पासून आनंदनगरपर्यंत काम पूर्ण आहे, मात्र तेथील मॉलच्या बाहेर खाद्यपदार्थांच्या अनेक टपऱ्या उभारण्यात आल्या आहेत. तेथे ग्राहकांसाठी टेबल-खुर्च्याही ठेवण्यात आल्या आहेत. तेथून पुढे महावीर चौकापर्यंत असलेल्या आनंदनगरमधील काम अद्याप सुरू झालेले नाही. महावीर चौकापासून पुढे जयश्री चित्रपटगृहापर्यंत मेट्रो स्थानकाचे काम सुरू आहे. त्यामुळे तेथेही या प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही. तेथून अग्रेसन भवनपर्यंत काही जागा महापालिकेला हस्तांतरित करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे काम सुरू नसल्याचे महापालिका अधिकारी सांगतात. आकुर्डी खंडोबा माळ ते निगडीपर्यंत अर्धवट काम झाले आहे, तर काही ठिकाणी काम सुरू आहे. काही ठिकाणी काम सुरूच झालेले नाही.
—