मारायचे होते सासूला पण मेला पती; प्रेम प्रकरणातून विषय प्रयोग केल्याचे उघड

मारायचे होते सासूला, पण पतीचाच मृत्यू
उंबरगावात प्रेम प्रकरणातून विषप्रयोग; पत्नी अन्‌ प्रियकर अटकेत
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. २० : पत्नीने प्रियकराच्या मदतीने सासूला विष देण्याचा कट रचला; मात्र त्याच विषारी पाण्याचे सेवन पतीने केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पोलिस तपासात उघड झाली आहे. या प्रकरणी पत्नीसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना उंबरगाव (ता. पंढरपूर) येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उंबरगाव येथील समाधान लोहार (वय ३४) यांचा विवाह २०१३ मध्ये सारिका (वय ३२) हिच्याशी झाला होता. विवाहानंतर काही वर्षांनी सारिका व तिची सासू विमल यांच्यात वारंवार वाद होऊ लागले. मागील चार वर्षांपासून सारिका हिचे गावातील शेखर संताराम चंदनशिवे याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले होते. याबाबत पती समाधान व सासू विमल यांना माहिती असून त्यातून घरात सतत वाद होत होते.
१० जानेवारी २०२६ रोजी सकाळी शेखरने सारिकाला शेतात बोलावून पांढऱ्या रंगाचे विषारी औषध असलेली अर्धवट भरलेली पाण्याची बाटली दिली. आपल्या संबंधांना आड येणाऱ्या सासूला संपवण्यासाठी हे औषध पिण्याच्या पाण्यात टाक, असे त्याने सांगितले. त्यानुसार रात्री घरात कोणी नसताना सारिकाने कळशीतील पाण्यात ते विषारी औषध टाकले व बाटली जाळून टाकली.
दरम्यान, सासूने ते पाणी पिताना चव कडू लागल्याने तांब्यातील पाणी मुलगा समाधानजवळ ठेवले. त्यानंतर जेवणानंतर समाधान यांनी तेच पाणी पिले. रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान १६ जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी शेखर संताराम चंदनशिवे व सारिका समाधान लोहार यांनी संगनमताने कट रचून पती समाधान गणपत लोहार यांना विषारी पाणी पाजून ठार मारल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे करत आहेत.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart