
मुंबईतील पालखी बंगल्यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला कुटुंबीयांची उपस्थिती होती. साध्या पण भावनिक वातावरणात झालेल्या या समारंभात माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आपल्या मुलाबद्दल अभिमान व्यक्त केला. कुटुंबातील सदस्यांनी योगेश कदम यांच्या कामाचे कौतुक केले. वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त झालेल्या भावना आणि अपेक्षांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांनी मनोगत व्यक्त केले. मला माझ्या मुलाचा खूप अभिमान आहे. बापसे बेटा सवाई असा प्रकार इथे झाला आहे, असे त्या म्हणाल्या. त्यांनी मुलाच्या कार्याचा गौरव करताना मोठी अपेक्षाही व्यक्त केली. माझा मुलगा मुख्यमंत्री झाला पाहिजे, अशी इच्छा त्यांनी उघडपणे व्यक्त केली. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. रामदास कदम म्हणाले की, मी मंत्री झालो तेव्हा मला एकच खाते मिळाले होते. पण आज माझा मुलगा एकाच वेळी पाच-पाच खाती सांभाळत आहे. त्यांनी पुढे सांगितले की, भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणतीही जबाबदारी दिली तर योगेश कदम ती समर्थपणे पार पाडू शकतात. आपल्या मुलाने अल्पावधीत मिळवलेली जबाबदारी आणि कामाची पद्धत पाहून समाधान वाटत असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय संकेतांचा वेध घेतला जात आहे. रामदास कदम यांनी आणखी एक गोष्ट सांगितली. योगेश कदम यांचे काम संपूर्ण राज्य पाहत आहे, असे ते म्हणाले. योगेश जेव्हा विधिमंडळात बोलतात तेव्हा माझे जुने सहकारी मला फोन करून सांगतात की तुमचा मुलगा परिपक्वतेने उत्तरे देतो, अशी माहिती त्यांनी दिली. आमदारकीची ही दुसरी मुदत असूनही त्यांच्या उत्तरांमध्ये स्थैर्य आणि आत्मविश्वास दिसतो, असेही ते म्हणाले. त्यामुळे मुलाच्या कामगिरीचा त्यांना विशेष अभिमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न – योगेश कदम आईच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमात भावनिक वातावरण निर्माण झाले. कुटुंबातील सदस्यांनी योगेश कदम यांच्या वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले. वाढदिवस हा केवळ कौटुंबिक समारंभ नसून भविष्यातील अपेक्षा आणि आशा व्यक्त करण्याचा क्षण ठरला. आई-वडिलांच्या भावना आणि त्यांच्या मुलाबद्दलचा विश्वास स्पष्टपणे दिसून आला. वाढदिवसानंतर योगेश कदम यांनीही प्रतिक्रिया दिली. मी आज ज्या ठिकाणी आहे ते आई-वडील आणि जनतेच्या आशीर्वादामुळेच, असे त्यांनी नमूद केले. राजकारणात पुढे जाताना जनतेचा आधार महत्त्वाचा असतो, हे त्यांनी अधोरेखित केले. हजारो नागरिकांचा आशीर्वाद मिळत असल्याने आपण नशीबवान असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातही जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.