Wednesday, March 18, 2026
HomeNewsMartahiमंत्री झिरवाळांचा खासगी सचिव कार्यमुक्त:लाचखोरी प्रकरणात झाले होते गंभीर आरोप; डॉक्टर रामदास...

मंत्री झिरवाळांचा खासगी सचिव कार्यमुक्त:लाचखोरी प्रकरणात झाले होते गंभीर आरोप; डॉक्टर रामदास गाडे यांची मूळ आस्थापनात बदली

मंत्री झिरवाळांचा खासगी सचिव कार्यमुक्त:लाचखोरी प्रकरणात झाले होते गंभीर आरोप; डॉक्टर रामदास गाडे यांची मूळ आस्थापनात बदली
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आपले खासगी सचिव रामदास गाडे यांच्यावर कडक कारवाई केली आहे. त्यांनी रामदास गाडे यांना अन्न व औषध प्रशासन विभागातून कार्यमुक्त करत त्यांना परत त्यांच्या मूळ आस्थापनेत पाठवण्याचे आदेश दिलेत. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अन्न व औषधी प्रशासन खात्यातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्याने 50 हजार रुपयांपैकी 35 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. सध्या हा लिपिक पोलिसांच्या कोठडीत आहे. त्याने झिरवाळ यांचे स्वीय सहाय्यक रामदास गाडे याचे नाव घेतल्याची माहिती आहे. थेट मंत्रालयातच लाचखोरीचा हा प्रकार घडल्यामुळे राज्यात एकच खळबळ माजली होती. विरोधकांनी या प्रकरणी नरहरी झिरवाळ यांना धारेवर धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावर झिरवाळ यांनी या प्रकरणाशी आपला संबंध आढळला तर आपण स्वतःहून राजीनामा देऊ असे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर झिरवाळ यांनी उपरोक्त कारवाई केली आहे. रामदास गाडेची सेवा मूळ विभागात वर्ग यासंबंधीच्या माहितीनुसार, ​अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आपले खाजगी सचिव डॉक्टर रामदास गाडे यांना तातडीने पदावरून कार्यमुक्त केले आहे. गाडे हे झिरवाळ यांच्या मंत्रालयात प्रतिनियुक्तीवर होते. पण आता त्यांची सेवा त्यांच्या मूळ विभागात (कृषि व पदुम विभाग) वर्ग करण्यात आली आहे. झिरवाळ यांनी या प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाला तातडीने आदेश काढण्याचे निर्देश दिले आहेत. सुनेत्रा पवारांनी सुनावले खडेबोल उल्लेखनीय बाब म्हणजे लाचखोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत नरहरी झिरवाळ यांच्या खात्याच्या कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. स्वतःची व पक्षाची प्रतिमा मलिन होणार नाही याची काळजी घ्या. विशेषतः प्रशासन व अधिकारी बदनाम होणार नाही याचीही खबरदारी घ्या, असे खडेबोल सुनेत्रा अजित पवार यांनी या प्रकरणी झिरवाळांना सुनावले होते. आता पाहू लाचखोरीनंतर काय म्हणाले होते नरहरी झिरवाळ? नरहरी झिरवाळ यांनी या प्रकरणी विस्तृत स्पष्टीकरण दिले होते. ते नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले होते, माझ्या विभागातील क्लार्क लाचखोरीच्या प्रकरणात सापडला ही माझीही जबाबदारी आहे. ही जबाबदारी माझी नाही असे बोलून चालणार नाही. त्याने जे कृत्य केले आहे, त्या कृत्याला मी पाठिशी घालणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. त्या चौकशीत या प्रकरणाचे धागेदोरे माझ्यापर्यंत आले तर मी स्वतःहून 100 टक्के मंत्रिपदाचा राजीनामा देईन. झिरवाळांच्या कार्यालयात लाचखोरीच्या 3 रेषा मंत्रालयातील लाचखोरीचा एक व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडिओ शूट करणाऱ्या निर्मल शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना झिरवाळ यांच्या कार्यालयात पैशांचा कसा व्यवहार चालतो? हे सांगितले होते. त्यांच्या माहितीनुसार, प्रस्तुत प्रकरणात मंत्री नरहरी झिरवाळ यांचा खासगी सचिव रामदास गाडे याचाही समावेश आहे. अन्न व औषध प्रशासन खात्याच्या कार्यालयात येणाऱ्या फाईल्सवर लाल, हिरव्या पट्ट्या मारून त्यावर कुणाला किती पैसे द्यायचे हे विशेष खून करून लिहिले जायचे. विशेष म्हणजे या मेडिकल सस्पेन्शनच्या सुनावण्या मंत्री घेत नव्हते, तर त्यांचे अधिकारी घेत होते. या प्रकरणी कुणाचीही ओळख सांगितली तरी या विभागात पैसे द्यावेच लागतात, असेही निर्मल शर्मा यांनी सांगितले आहे.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments