![]()
भिवंडी महापालिकेच्या महापौर निवडीत आज अत्यंत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. राज्याच्या राजकारणात महापालिका निवडणुकांनंतरचे सत्तासंघर्ष अद्याप सुरूच असून, भाजपचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर महापौरपदावर कब्जा मिळवला आहे. या अनपेक्षित युतीमुळे भिवंडीच्या स्थानिक राजकारणात मोठा उलटफेर झाला असून भाजपला स्वतःच्याच गोटातून धक्का बसला आहे. या निवडणुकीत केवळ बंडखोरीच झाली नाही, तर भाजपचे सहा नगरसेवक फुटल्याची माहिती समोर येत आहे. चंद्रपूर महापालिकेतील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता भिवंडीतही असाच राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपच्या अधिकृत धोरणांविरुद्ध जात नगरसेवकांनी बंडखोर उमेदवाराला साथ दिल्याने पक्षांतर्गत शिस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या सर्व प्रकारावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अत्यंत कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाच्या ध्येयधोरणांच्या विरोधात काम करणाऱ्यांवर आणि बंडखोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. पक्षादेश (व्हिप) डावलणाऱ्या या सहा नगरसेवकांवर आता अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे. रवींद्र चव्हाण म्हणाले, भिवंडीच्या महापौरपदाबाबत आमच्या चर्चा सुरू होत्या. त्यामध्ये भिवंडी महापालिका महापौरपदाबाबत कोणी अर्ज भरावा, याबाबत सुरुवातीला नारायण चौधरी यांच्या नावाची निवड करण्यात आली होती. पण नंतरच्या काळात काही घडामोडी घडल्या आणि हा विषय प्रदेश पातळीवर गेला. तेव्हा स्नेहा पाटील यांना ही उमेदवारी देण्याचे ठरले. त्यानंतर नारायण चौधरी आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या भाजपाच्या काही नगरसेवकांना बंडखोरी न करण्याबाबत समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई तसेच पुढे बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, जर तुम्ही बंडखोरी केली तर पक्ष तुमच्यावर कारवाई करेल असे त्या नगरसेवकांना सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यां नगरसेवकांनी आम्हाला सांगितले होते की आम्ही बंडखोरी करणार नाही. मात्र, त्यांनी बंडखोरी केली, हे निकालानंतर लक्षात आले. त्यामुळे आता ज्यांनी-ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले, त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.