भिगवण अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट:तरुणी मध्यरात्री पोलिस ठाण्यात हजर; स्वतःच्या मर्जीने पळून गेल्याचे प्रतिज्ञापत्र दिले लिहून, आत्महत्येची धमकी देत आई दाव्यावर ठाम

भिगवण अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट:तरुणी मध्यरात्री पोलिस ठाण्यात हजर; स्वतःच्या मर्जीने पळून गेल्याचे प्रतिज्ञापत्र दिले लिहून, आत्महत्येची धमकी देत आई दाव्यावर ठाम
इंदापूर तालुक्यातील भिगवण अपहरण प्रकरणातील अपहृत तरुणी काल मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर झाली आहे. या तरुणीने आपण स्वतःच आपल्या मित्रासोबत पळून गेल्याचा जबाब दिला आहे. यामुळे हे प्रकरण अपहरणाचे नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यानंतरही पोलिस या घटनेचा सर्वच अंगाने तपास करत आहेत. दुसरीकडे आई मात्र आपल्या दाव्यावर ठाम असून, तिने ब्लॅकमेल करून मुलीच्या अपहरणाचा आरोप केलाय. तसेच मुलगी आली नाही, तर आत्महत्या करू, अशी धमकी दिलीय. यासंबंधीच्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये गत 17 तारखेला एका तरुणीचे आई व भावासोबत लग्नाची खरेदी करून घरी परत येताना भरदिवसा अपहरण झाले होते. यावेळी आई व भावाला मारहाण करत त्यांच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकण्यात आली होती. तयानंतर तरुणीला टेम्पोत टाकून पळवून नेण्यात आले होते. पीडित कुटुंबाने त्यासंबंधीची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. त्यानुसार, आरोपी जहीर हारुन शेख व आयान हारुन शेख या 2 सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण नंतर तरुणीने एका व्हिडिओद्वारे आपले अपहरण झाले नसून आपण स्वतःच पळून गेल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी 6 पथके रवाना केली होती. पण तिचा शोध लागला नव्हता. प्रियकरासोबत फिरून मध्यरात्री पोलिस ठाण्यात हजर अखेर गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही तरुणी बारामती शहर पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाली. यावेळी तिने दिलेल्या जबाबाद्वारे कथित अपहरणानंतर ती आपल्या मित्रासोबत कुठे-कुठे गेली होती हे स्पष्ट् झाले. यासंबंधीच्या माहितीनुसार, ती आपल्या मित्रासोबत श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे, सासवड असा प्रवास करून महाबळेश्वरला गेली. तेथून ते मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर झाले. तिथे आल्यावर पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवला. त्यात तिने आपले अपहरण झाले नसून, आपण स्वतःच्या मर्जीने पळून गेल्याचे नमूद केले. यावेळी पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना ठाण्यात बोलावले, पण ते आले नसल्याची माहिती आहे. नेमकी कशी घडली होती घटना? मुलगी आपल्या आई व भावासोबत दुचाकीने लग्नाची खरेदी करून घरी जात होती. त्यावेळी संधी साधून तिने आपल्या भावाच्या मोबाईलवरून आपल्या प्रियकराला फोन केला. त्याला शहरातील शासकीय विश्रामगृहाजवळ बोलावले. तेथून ते निघून गेले. पीडित कुटुंबाने आपल्या तक्रारीत अपहरणकर्त्यांनी आपल्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून मुलीला पळवून नेल्याचा दावा केला होता. पण वैद्यकीय अहवालात या प्रकरणी मिरचीपूडचा वापर झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सध्या मुलगी बारामती शहर पोलिसांच्या ताब्यात आहे. ती सध्या आराम करत आहे. या प्रकरणी सध्या त्यांच्याकडून कमालीची गोपनियता बाळगली जात आहे. पोलिस मुलाला एका खासगी गाडीतून पहाटे 5.30 च्या सुमारास बाहेर घेऊन गेलेत. ते त्याला कुठे घेऊन गेलेत हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तरुणीने आपल्या प्रतिज्ञापत्रात काय म्हटले? संबंधित तरुणीने एक प्रतिज्ञापत्रही तयार केले आहे. त्यात ती म्हणते, माझे व त्याचे प्रेम होते. मी हे घरच्यांना सांगितले होते. माझा दुसऱ्या मुलासोबत लग्न करण्यास विरोध होता. त्यामुळे मी संबंधित मुलासोबत स्वमर्जीने पळून गेले. या प्रकरणी मिरचीपूड फेकल्याचा दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा आहे. सोशल मीडियावरून मला कळले की, माझ्या आईने माझ्या अपहरणाचा खोटा गुन्हा दाखल केला. माझ्या आई व भावाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकण्यात आली नाही. तसेच त्यांची नथ व चांदीची अंगठीही हिसकावून नेली नाही. सदरची खोटी फिर्याद आईने कुणाच्यातरी सांगण्यावरून किंवा कुणाच्यातरी दबावाने दिली असावी. माझ्या आईच्या फिर्यादीमधील मजकुराप्रमाणे कोणतीही घटना घडली नाही. मी माझ्या राजीखुषीने व मर्जीने 1 वर्षभरापासून असणाऱ्या प्रेमसंबंधांमुळे निघून गेले होते. मी पूर्णतः संज्ञान असल्यामुळे मला माझ्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. आईने दिली आत्महत्येची धमकी दुसरीकडे, तरुणीच्या आईने माध्यमांशी बोलताना आपली मुलगी घरी आली नाही तर आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या, माझ्या पतीचे कोरोना काळात निधन झाले. त्याचा गैरफायदा या लोकांनी घेतला. माझी मुलगी 12 वर्षांपासून दबावाखाली आहे. तिला ब्लॅकमेल केले जात आहे. ती सर्वकाही दबावाखाली बोलत आहे. तिची तक्रारही खोटी आहे. ती आमच्याकडे परत आली नाही तर आम्ही याच ठिकाणी आत्महत्या करू. आम्हाला पोलिस सहकार्य करत नाही. ते तिला घेऊन कोर्टात गेले. तिला उचलून गाडीत टाकण्यात आले. मी ओरडले. पण कुणीही मदतीला आले नाही, असे त्यांनी म्हटले आहे. व्हिडिओ खरे की खोटे समजत नाही – काका तरुणीच्या काकांनी तिच्या व्हिडिओवर संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले, मुलगी बारामती पोलिस ठाण्यात आल्याचे आम्हाला रात्री समजले. पण आम्हाला तिथे जाता आले नाही. कारण, तिच्या आईची तब्येत बिघडली होती. त्यांना पहिल्यांदा भिगवणच्या एका रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर आम्ही तिकडे जाणार आहोत. आमच्या मुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात ती आमचे 9 वर्षांपासून आमचे संबंध असल्याचे सांगते. त्यानंतर समोर आलेल्या प्रतिज्ञापत्रात ती 1 वर्षांपासून संबंधांत असल्याचा दावा करते. त्यामुळे व्हिडिओ खरा की खोटा समजत नाही. सध्या ती पोलिसांच्या ताब्यात आहे. प्रचंड दबावाखाली आहे. आम्ही तिच्याशी बोलू आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. काय म्हणाला तरुणीचा भाऊ तरुणीच्या भावाने आम्हाला मारहाण करून बहिणीला पळवून नेल्याचा पुनरुच्चार केला आहे. तो म्हणाला, त्या दिवशी आम्ही लग्नाची खरेदी करून घरी परत येत होतो. त्यावेळी आरोपींनी रस्त्यात अडवून आम्हाला मारहाण केली. आमच्या डोळ्यात चटणी टाकली. माझ्या बहिणीला गाडीत टाकून नेले. ती स्वतःहून गेली नाही, तर तिला जबरदस्तीने नेले. घटना घडली तेव्हा तिथे दुसरे कुणीच नव्हते. तिला आमच्या ताब्यात दिले पाहिजे. मामाचाही पोलिस ठाण्यापुढे आत्महत्येचा इशारा तरुणीच्या मामानेही या प्रकरणी पोलिस ठाण्यापुढे आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, पोलिसांनी तिचे व्हिडिओ व इतर गोष्टी तपासल्या पाहिजेत. ती म्हणजे चटणी टाकली नाही, पण घटनास्थळी चटणी पडलेली होती. तिने तिच्या भावाच्या फोनवरून फोन केला होता, तर त्याचीही खातरजमा केली पाहिजे. कारण, तिच्याकडेही एक फोन होता. त्यांचे कॉल रेकॉर्ड काढले पाहिजे. कुणी कुणाला फोन केला, त्यांच्यात काय संवाद झाला ही सर्व माहिती उजेडात आली पाहिजे. आरोपींना अटक करा. त्यांच्या हातात माझी भाची होती. तिच्यावर त्यांचा दबाव होता. ते शिक्षणासाठी दुसरीकडेच होती. मग ती आरोपीसोबत रिलेशनशीपमध्ये कशी आली? असा सवालही तरुणीच्या मामाने उपस्थित केला आहे. तरुणीला वडील नाहीत. त्यामुळे ती घाबरत आहे. तिली तीची आई व भावाला ठार मारण्याची भीती दाखवली जात आहे. ती आम्हाला मिळाली नाही, तर आम्ही कुटुंबासह आत्महत्या करू, असे ते म्हणाले.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart