
इंदापूर तालुक्यातील भिगवण अपहरण प्रकरणातील अपहृत तरुणी काल मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर झाली आहे. या तरुणीने आपण स्वतःच आपल्या मित्रासोबत पळून गेल्याचा जबाब दिला आहे. यामुळे हे प्रकरण अपहरणाचे नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यानंतरही पोलिस या घटनेचा सर्वच अंगाने तपास करत आहेत. यासंबंधीच्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये गत 17 तारखेला एका तरुणीचे आई व भावासोबत लग्नाची खरेदी करून घरी परत येताना भरदिवसा अपहरण झाले होते. यावेळी आई व भावाला मारहाण करत त्यांच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकण्यात आली होती. तयानंतर तरुणीला टेम्पोत टाकून पळवून नेण्यात आले होते. पीडित कुटुंबाने त्यासंबंधीची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. त्यानुसार, आरोपी जहीर हारुन शेख व आयान हारुन शेख या 2 सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण नंतर तरुणीने एका व्हिडिओद्वारे आपले अपहरण झाले नसून आपण स्वतःच पळून गेल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी 6 पथके रवाना केली होती. पण तिचा शोध लागला नव्हता. प्रियकरासोबत फिरून मध्यरात्री पोलिस ठाण्यात हजर अखेर गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही तरुणी बारामती शहर पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाली. यावेळी तिने दिलेल्या जबाबाद्वारे कथित अपहरणानंतर ती आपल्या मित्रासोबत कुठे-कुठे गेली होती हे स्पष्ट् झाले. यासंबंधीच्या माहितीनुसार, ती आपल्या मित्रासोबत श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे, सासवड असा प्रवास करून महाबळेश्वरला गेली. तेथून ते मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर झाले. तिथे आल्यावर पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवला. त्यात तिने आपले अपहरण झाले नसून, आपण स्वतःच्या मर्जीने पळून गेल्याचे नमूद केले. यावेळी पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना ठाण्यात बोलावले, पण ते आले नसल्याची माहिती आहे. नेमकी कशी घडली होती घटना? मुलगी आपल्या आई व भावासोबत दुचाकीने लग्नाची खरेदी करून घरी जात होती. त्यावेळी संधी साधून तिने आपल्या भावाच्या मोबाईलवरून आपल्या प्रियकराला फोन केला. त्याला शहरातील शासकीय विश्रामगृहाजवळ बोलावले. तेथून ते निघून गेले. पीडित कुटुंबाने आपल्या तक्रारीत अपहरणकर्त्यांनी आपल्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून मुलीला पळवून नेल्याचा दावा केला होता. पण वैद्यकीय अहवालात या प्रकरणी मिरचीपूडचा वापर झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सध्या मुलगी बारामती शहर पोलिसांच्या ताब्यात आहे. ती सध्या आराम करत आहे. या प्रकरणी सध्या त्यांच्याकडून कमालीची गोपनियता बाळगली जात आहे. पोलिस मुलाला एका खासगी गाडीतून पहाटे 5.30 च्या सुमारास बाहेर घेऊन गेलेत. ते त्याला कुठे घेऊन गेलेत हे अद्याप स्पष्ट झाले नाही.