
घराबाहेर खेळत असताना भिंतीचा काही भाग ढासळल्याने अडीच वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि. १७)सायंकाळी ६.३० वाजता सातपूर कॉलनीत घडली होती. या चिमुकल्यावर रुग्णालयात उपचार सुरू हाेते. मात्र, उपचारादरम्यान ८ तास मृत्यूशी झुंज अपयशी ठरल्याने त्याचा मृत्यू झाला. सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १७) सायंकाळी ६ वाजता मोहम्मद उझेर खान (अडीच वर्षे, रा. कामगार भवन, सातपूर कॉलनी) हा घराजवळ खेळत होता. यावेळी घराला लागूनच असलेली जीर्ण झालेली भिंत ढासळली आणि या बालकाच्या अंगावर विटा पडल्याने त्याच्या डोक्याला व छातीला जबर मार लागला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने सातपूरमध्येच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथून महात्मानगर आणि नंतर शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मार अधिक लागल्याने उपचार सुरू असताना रात्री दीड वाजेच्या सुमारास या बालकाचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी तपासून जाहीर केले. या बालकाचे वडील हॉटेलमध्ये आचारी असून त्याला दोन बहिणी आहेत. डाेळ्यापुढे खेळत असलेल्या मुलाचा अचानक असा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे