पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचा लाभ घ्या
जिल्हाधिकारी संतोष पाटील; विविध कृषी उत्पादने उपलब्ध
सातारा, ता. २० : कृषी विभागामार्फत साताऱ्यातील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आजपासून पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली विविध कृषी उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली असून, याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
महोत्सवामध्ये ज्वारीच्या विविध वाणांचे धान्य उपलब्ध आहेत. त्यामध्ये मालदांडी, सुपर मोती, परभणी मोती, फुले रेवती व फुले सुचित्रा, परळी खोऱ्यातील देशी नाचणी, तांदूळ, जावळीची नाचणी, माण व खटावची बाजरी, मूग व ज्वारी उपलब्ध आहे. कडधान्यांमध्ये जात्यावर दळलेली मूग, उडीद, काळ्या घेवड्याची डाळ तसेच हिरवा मूग, हुलगे आदी महोत्सवामध्ये विक्रीस उपलब्ध आहेत.
पदार्थ आजपर्यंत उपलब्ध
—————-
वाईची सेंद्रिय हळद तसेच मिलेटचे विविध पदार्थ त्यामध्ये विविध प्रकारच्या नाचणीच्या शेवया, नाचणीचे इडली पीठ, उडीद लाडू, नाचणी अंबिल तसेच पौष्टिक तृणधान्यांपासून तयार केलेले प्रक्रिया पदार्थ आदी वैशिष्ट्यपूर्ण व दर्जेदार उत्पादने शेतकरी गट, महिला बचत गट यांच्या माध्यमातून उद्यापर्यंत (शनिवार) विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
26B01645
सातारा : पौष्टिक तृणधान्य महोत्सव उद्घाटन करताना संतोष पाटील. त्या वेळी भाग्यश्री फरांदे, अजय शेंडे आदी.
—–