
जळगाव जामोद येथील महामानवाच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणातील आरोपीची नार्को टेस्ट करून संपूर्ण घटनेमागील सत्य समोर आणावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी, जळगाव जामोदच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात १६ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केले की, १४ फेब्रुवारी रोजी घडलेल्या विटंबना प्रकरणातील आरोपी राहुल लांडे याने केलेल्या कृत्याचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपीची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, नगर परिषदेकडून बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे घटना घडण्याच्या दोन दिवस आधीच बंद का होते, याची चौकशी करण्यात यावी. आरोपीच्या मोबाइलचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासण्यात यावा. तसेच घटना घडलेल्या दिवशीचे दिवसभरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून या प्रकरणामागील सूत्रधार कोण आहे, याचा शोध घ्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनावर जिल्हा महासचिव आतिश खराटे, तालुका अध्यक्ष देवानंद दामोदर, महिला अध्यक्षा विशाखा सावंग, रतन नाईक, सुनील बोदडे आदींची मागणी होते.