
संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ अभियानाचा चौथा टप्पा रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरात एकाच वेळी सुरू होणार आहे. परम श्रद्धेय सतगुरु माता सुदीक्षा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८ ते ११ या वेळेत ही मोहीम राबवली जाईल. पुण्यात मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात इंद्रायणी, मुळा, मुठा, भीमा, भामा, घोडनदी, पवना, वेळू, कुकरी, मिना, कऱ्हा, मांडवी, आनंदी या नद्यांसह शहरातील विविध तलावांचा या मोहिमेत समावेश आहे. एकूण ४२ ठिकाणी स्वच्छता कार्य केले जाईल. संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगिंदर सुखीजा यांनी माहिती दिली की, हा विशाल उपक्रम देशभरातील १५०० हून अधिक ठिकाणी एकाच वेळी आयोजित केला जाईल. पाणी हे केवळ एक साधन नसून जीवनाचा आधार आणि ईश्वराची अमूल्य देणगी आहे. त्याचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे, ही जागृती समाजात निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. संत निरंकारी मिशनने बाबा हरदेव सिंह यांच्या प्रेरणादायी शिकवणी आत्मसात करून सन २०२३ मध्ये संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने ‘प्रोजेक्ट अमृत’ची सुरुवात केली होती. जलसंवर्धन हा केवळ एका दिवसापुरता किंवा मर्यादित मोहिमेपुरता न ठेवता, तो एक जीवनशैली, संस्कार आणि सेवाभाव म्हणून स्वीकारण्याची प्रेरणा बनेल, जिथे स्वच्छ जलातून स्वच्छ मन आणि स्वच्छ समाज घडू शकेल, अशी या मिशनची दूरदृष्टी आहे. नद्या, तलाव, सरोवरे, विहिरी व झरे अशा नैसर्गिक जलस्रोतांच्या संरक्षणासाठी समर्पित या जनआंदोलनाने आपल्या पहिल्या तीन टप्प्यांत सेवा, समर्पण व सहभागाचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण केले आहे. याच यशामुळे प्रेरित होऊन हा चौथा टप्पा अधिक व्यापक, संघटित व दूरदृष्टीपूर्ण स्वरूपात राबविला जात आहे, ज्यामुळे समाजातील प्रत्येक घटकात निसर्गाबद्दल जागरूकता व सहभागाची सशक्त भावना निर्माण होईल. या अभियानांतर्गत मधुर समूह गायन, जनजागृती चर्चासत्रे आणि सोशल मीडिया मोहिमेद्वारे जलजन्य आजार आणि स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे. जेव्हा मन निर्मळ असते तेव्हाच निसर्ग स्वच्छ राहतो आणि जेव्हा सेवेत समर्पण असते तेव्हा समाजाचे नवनिर्माण होते, या संकल्पनेला हे अभियान बळ देईल.