![]()
देशातील सामाजिक व सांस्कृतिक वातावरण गढूळ झाले असून, या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी जनतेला सोबत घेऊन पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभे करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे नियोजित अध्यक्ष शाहीर संभाजी भगत यांनी केले. सातारा येथे त्यांच्या सत्कारप्रसंगी उत्तर देताना त्यांनी हे आवाहन केले. पंधराव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या संयोजन समिती व विद्रोही सांस्कृतिक चळवळ, सातारा यांच्या वतीने दैवज्ञ सांस्कृतिक भवन येथे आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. हा गौरव लक्ष्मण माने आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राष्ट्रीय मुख्य समन्वयक डॉ. भारत पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्याध्यक्ष कॉ. धनाजी गुरव, सरचिटणीस डॉ. जालिंदर घीगे तसेच संयोजन समितीचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ. सुहास महाराज फडतरे उपस्थित होते. उच्चवर्णीय व पुरुषसत्ताक राजकारणाला पर्याय आवश्यक शाहीर संभाजी भगत म्हणाले की, “उच्चवर्गीय, उच्चवर्णीय आणि पुरुषसत्ताक सांस्कृतिक राजकारणाला उत्तर देण्यासाठी पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभे करणे अपरिहार्य आहे. धारावी येथे भरलेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या भक्कम पायावर ही चळवळ उभी राहिली आहे. जनतेला सोबत घेऊन हा संघर्ष अधिक व्यापक करणे ही काळाची गरज आहे.” क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त हे संमेलन साताऱ्यात आयोजित करण्यात आले आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच साताऱ्यात आगमन झालेल्या संभाजी भगत यांचा क्रांतिसिंह नाना पाटील यांची प्रतिमा, भारतीय संविधानाची प्रस्तावना, विद्रोही सन्मानचिन्ह आणि ‘विद्रोही धोरण व जाहीरनामा’ ग्रंथ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ‘एल्गार’ची हीच वेळ – डॉ. पाटणकर डॉ. भारत पाटणकर यांनी आपल्या भाषणात विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला. “प्रतिसरकारच्या भूमीत हे संमेलन होत आहे, याला विशेष ऐतिहासिक संदर्भ आहे. सध्याच्या परिस्थितीत व्यापक ‘एल्गार’ करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे,” असे ते म्हणाले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा – लक्ष्मण माने पद्मश्री लक्ष्मण माने यांनी साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मुस्कटदाबीवर खंत व्यक्त केली. “अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याच्या प्रवृत्तीविरुद्ध सर्व शक्तीनिशी संघर्ष करावा लागेल. मी या लढ्यात सहभागी राहीन,” असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मांडके यांनी केले, तर आभार प्रदर्शन अॅड. राजेंद्र गलांडे यांनी केले. यावेळी नंदकुमार ढाणे, भगवान अवघडे, जयंत उथळे, डॉ. प्रशांत पन्हाळकर, प्राचार्य डॉ. अरुण गाडे, अॅड. शरद जांभळे, प्रा. कविता म्हेत्रे, कॉ. प्रमोद परमणे, कॉ. शंकर पाटील, शैला यादव, जयवंत खराडे, संजय गाडे, गणेश भिसे, प्रा. डॉ. आर. के. चव्हाण, दिलीप भोसले, वामनराव गंगावणे, प्रियांका गडदे, शाहीर श्रीरंग रणदिवे, हणमंत सावंत, प्रा. डॉ. विजय पवार, जनार्दन घाडगे, दिलीप महादार, प्रा. डॉ. रामचंद्र ननावरे, प्रा. गौतम काटकर आदी मान्यवर उपस्थित होते. आ. ह. साळुंखे यांची भेट साताऱ्यात आगमनानंतर संभाजी भगत यांनी ज्येष्ठ विचारवंत व संमेलनाचे स्वागताध्यक्ष आ. ह. साळुंखे यांची ‘लोकायत’ निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. सध्याच्या सामाजिक परिस्थिती आणि संमेलनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मान्यवरांमध्ये सविस्तर चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर साताऱ्यात होणारे १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला नवे अधोरेखन देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.