
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे सार्वभौमत्व विकल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. भारत आतापर्यंत स्वतःच्या सुरक्षेचे निर्णय स्वतः घेत होता. त्यामुळे आपल्या लढाऊ विमानांच्या चाव्या परकीय राष्ट्राच्या हाती असणे हे राष्ट्रीय सुरक्षा, स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वासाठी एक मोठा धोका आहे. मोदींनी स्वतःची व भारताच्या सार्वभौमत्त्वाची अमेरिकेला विक्री केली आहे, असे ते म्हणालेत. भारताने फ्रान्सकडून 114 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी बहुतांश विमानांची भारतात निर्मिती होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भारताच्या सार्वभौमत्त्वाची विक्री केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, नरेंद्र मोदींनी भारताचे सार्वभौमत्व विकले आहे. डिसेंबर 2025 मध्ये, अमेरिकन कंपनी Loar Group ने फ्रेंच कंपनी एलएमबी एरोस्पेस विकत घेतली. एलएमबी एरोस्पेस राफेल विमानाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि रडारसाठी अंतर्गत जीवन-समर्थन प्रणाली म्हणून काम करणारे विशेष उच्च-कार्यक्षमता असलेले कूलिंग फॅन आणि इलेक्ट्रिक मोटर्स पुरवते. ‘एलएमबी’ची मालकी अमेरिकेकडे फ्रान्सने राफेल आयटीएआर-मुक्त असल्याचा दावा केला आहे. म्हणजेच ते अमेरिकेच्या नियंत्रणापासून स्वतंत्र आहे. एलएमबी ही एक फ्रेंच कंपनी आहे. त्यामुळे तिच्या राफेल विमानांचे सुटे भाग परदेशी खरेदीदारांना निर्यात आणि विक्री करण्यासाठी अमेरिकेची मंजुरी घेण्याची गरज नव्हती. तथापि, आता एलएमबीची मालकी एका अमेरिकन कंपनीकडे आली आहे. त्यामुळे आता या कंपनीकडून तयार करण्यात येणारे सुटे भाग युनायटेड स्टेट्स म्युनिशन लिस्ट (USML) मध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात. भारताच्या सार्वभौमत्त्वासाठी मोठा धोका याचा अर्थ असा की एलएमबीने उत्पादित केलेल्या आणि भारताला निर्यात केलेल्या या सुट्या भागांच्या भविष्यातील खरेदीवर अमेरिकन सरकार मागच्या दरवाज्याने नियंत्रण मिळवू शकते. हे महत्त्वाचे भाग पुरवणाऱ्या कंपनीवर नियंत्रण ठेवून, अमेरिका आता एलएमबीने उत्पादित केलेल्या दुरुस्ती आणि सुट्या भागांवर नियंत्रण ठेवेल. भारत आतापर्यंत स्वतःच्या सुरक्षेचे निर्णय स्वतः घेत होता. त्यामुळे आपल्या लढाऊ विमानांच्या चाव्या परकीय राष्ट्राच्या हाती असणे हे राष्ट्रीय सुरक्षा, स्वातंत्र्य व सार्वभौमत्त्वासाठी एक मोठा धोका आहे, असे आंबेडकरांनी म्हटले आहे. प्रश्न हा आहे की, मोदी राफेल का खरेदी करत आहेत रशियन बनावटीचे Su-57E का नाही? मोदींनी अमेरिकेला विकले गेलेत. त्यांनी भारताचे सार्वभौमत्त्वही अमेरिकेला विकले आहे, असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी या प्रकरणी केला आहे.