
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून निलंगा शहरात ऐतिहासिक आणि दुर्मिळ शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते दत्ता मोहोळकर व मित्रपरिवाराच्या पुढाकारातून बुधवारी, १८ फेब्रुवारी रोजी शहरातील राष्ट्रमाता जिजाऊ चौक येथे हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. या प्रदर्शनामध्ये शिवकालीन तलवारी, भाले, कट्यारी, ढाली आणि युद्धकलेत वापरली जाणारी अनेक दुर्मिळ शस्त्रे मांडण्यात आली होती. प्रत्येक शस्त्राची ऐतिहासिक माहिती आणि त्याचा वापर याबद्दलची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. “आजच्या पिढीने शिवरायांचा पराक्रमी इतिहास प्रत्यक्ष पाहून त्यातून प्रेरणा घ्यावी, हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजक दत्ता मोहोळकर यांनी सांगितले. या प्रदर्शनाला निलंगा शहरातील विविध शाळा-महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिवभक्तांनी भेट दिली. शिवकालीन शस्त्रास्त्रे जवळून पाहताना युवकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. या अभिनव उपक्रमाबद्दल शिवप्रेमींच्या वतीने दत्ता मोहोळकर व मित्रपरिवाराचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. निलंग्यातील जिजाऊ चौकात भरलेले हे प्रदर्शन म्हणजे शिवप्रेमींसाठी ज्ञानाची पर्वणीच ठरली. केवळ पुस्तकात वाचलेला इतिहास शस्त्रांच्या रूपात डोळ्यासमोर पाहून विद्यार्थी भारावून गेले. तलवारींच्या पात्यांपासून ते चिलखतापर्यंतच्या प्रत्येक वस्तूने शिवरायांच्या गनिमी काव्याची आणि पराक्रमाची आठवण करून दिली. निलंग्यात पहिल्यांदाच अशा स्वरूपाचे भव्य प्रदर्शन भरल्याने शहरात सर्वत्र या उपक्रमाचे कौतुक होत असून, तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाची नवी भावना जागृत झाली आहे.