
शेअर मार्केटमध्ये १ लाख रुपये गुंतवल्यास दीड लाख रुपये होतील, असे भाकीत सांगून गुंतवणुकीस भाग पाडणाऱ्या ज्याेतिष्याचेच भवितव्य आता अंधारात आहे. नाशिकमध्ये ३५ जणांना तब्बल ११ काेटींचा गंडा घातल्यानंतर फरार असलेल्या सचिन देशमुख नामक या ज्याेतिष्याच्या मागावर शहर पाेलिस असून सायबर पाेलिसांनी त्याच्याविराेधात लूकआऊट नाेटीस जारी केली आहे. सायबर पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित देशमुख याने एका किराणा दुकानदारास शरणपूर रोड परिसरात असलेल्या अंजनेय ज्योतिष कार्यालयात बोलावून घेत शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीस भाग पाडत ७३ लाखांचा गंडा घातला हाेता. याप्रकरणी संबंधित व्यावसायिकाने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. विशेष म्हणजे, आतापर्यंत एकूण ३५ गुंतवणूकदारांनी सायबर पोलिस ठाणे गाठून आमचीसुद्धा या ज्याेतिष्याने खोटे भाकीत सांगून फसवणूक केल्याची तक्रार दिली. सायबर पोलिसांनी तपासाला दिली गती दहा महिन्यांत दीड पटीच्या आमिषाने ओढायचा जाळ्यात पोलिसांनी सर्व ३५ जणांच्या तक्रारींची दखल घेत तपास सुरू केला आहे. १ लाख रुपयांचा १० महिन्यांत दीड लाख रुपये परतावा मिळेल, असे आमिष देशमुख गुंतवणूकदारांना देत असल्याचे तपासात समोर आले. आणखी अनेकांना फसवले असण्याची शक्यता आहे. फसवणूक झालेल्यांनी निर्भीडपणे समोर यावे फसवणुकीच्या या गुन्ह्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. ११ कोटींपेक्षाही आकडा वाढू शकताे. तपास सुरू आहे. लूकआऊट नोटीस जारी केली आहे. अजूनही कुणाची फसवणूक झाली असल्यास निर्भीडपणे आमच्याशी संपर्क करावा. – संजय पिसे, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे देश सोडण्याच्या बेतात असणाऱ्यांना रोखते नोटीस गुन्हेगारांना देश सोडून पळून जाण्यापासून रोखण्यासाठी जारी केलेली ‘सतर्कतेची सूचना’ म्हणजे लूकआऊट नाेटीस. जेव्हा एखादी व्यक्ती गंभीर गुन्ह्यात सहभागी असते किंवा तपास यंत्रणांना ती हवी असते, तेव्हा ही नोटीस काढली जाते. ही नोटीस सर्व विमानतळ, बंदरे आणि सीमा तपासणी नाक्यांवर पाठवली जाते. जर गुन्हेगार व्यक्ती देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न करत असेल, तर इमिग्रेशन अधिकारी तिला अडवतात आणि संबंधित तपास यंत्रणेला कळवतात. यामुळे आरोपीला देशातच रोखून त्याचा तपास करणे सोपे जाते.