नवी मुंबईत ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर
नवी मुंबई शिवजयंती उत्साहात साजरी
वाशी, ता. १९ (बातमीदार) ः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती नवी मुंबईत गुरुवारी (ता. १९) उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी नवी मुंबई ढोल-ताशांच्या गजरात, फटक्यांच्या आतषबाजीत, जय भवानी… जय शिवाजी…च्या घोषणा देत शिवभक्तांनी नवी मुंबई परिसर दणाणून सोडला होता. यामध्ये आबालवृद्धांपासून बच्चेकंपनीपर्यंत सर्वांनी पांरपरिक वेषात रॅलीत सहभाग घेतला होता. या वेळी नवी मुंबई भगवामय झाली होती.
नवी मुंबई पालिकेच्या वतीने विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते, उपमहापौर दशरथ भगत व आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. त्याचप्रमाणे नेरूळ सेक्टर १ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळील चौकात स्थापित शिवरायांच्या सिंहासनारूढ पुतळ्याला महापौरांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या दोन्ही चौकात शिवरायांच्या पुतळ्याभोवताली आकर्षक पुष्पसजावट केलेली होती. जयंतीच्या आदल्या दिवसापासूनच चौकांच्या चारही बाजूंना विद्युत दीपमाळांची रोषणाई केली आहे. पुतळ्यांच्या सभोवताली लक्षवेधी रोषणाई करण्यात आली आहे.
विविध शाळांनी आणि शिवप्रेमी संघटनांनी आपल्या परिसरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत शिवज्योतीसह पदयात्रा काढून, शिवरायांचा जयजयकार करीत अनोखी मानवंदना अर्पण केली. जय भवानी, जय शिवाजीच्या नामघोषात सारा परिसर निनादला होता. रंगावलीकार श्रीहरी पवळे यांनी चौकात काढलेली छत्रपती शिवरायांची रांगोळी लक्ष वेधून घेत होती. अनेकांनी रांगोळी समवेत सेल्फी छायाचित्रे काढली. विशेषत्वाने तरुणाईने चौकातील शिवचरित्र शिल्पकृतींना भेट देऊन शिवरायांचा चरित्रपट जयंतीनिमित्त अनुभवला. शिल्पाकृती वास्तूच्या वरील बाजूस असलेल्या घुमटांवर लावलेल्या शिवरायांच्या विविध भावमुद्रा असणाऱ्या छायाचित्रांमुळे चौकातील वातावरण भारलेले होते.
नेरूळ येथील चौकात नुकताच नोव्हेंबर २०२५ मध्ये शिवप्रभूंचा सिंहासनारूढ पुतळा स्थापित करण्यात आलेला असून, त्या ठिकाणी यावर्षी पहिल्यांदाच शिवजयंती उत्सव साजरा होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह होता. शिवरायांच्या पुतळ्यावर असलेल्या मेघडंबरीला आकर्षक पुष्पसजावट केली होती. दोन्ही ठिकाणी दिवसभर शिवचरित्रावर आधारित गीते, पोवाडे यांचे ध्वनिक्षेपकाव्दारे सादरीकरण होत असल्याने शिवरायांच्या नावाचा गजर नवचैतन्य निर्माण करणारा आहे.