वाल्हे, ता. १८ : दौंडज (ता. पुरंदर) येथील स्वामी समर्थ अनंत मठामध्ये एस. टी. महामंडळातील सेवानिवृत्त चालक-वाहकांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. यावेळी विविध आगारांतील सुमारे साडेतीनशे सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे विभागीय कार्यालयातील सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक बाळासाहेब भुजबळ होते. यावेळी सुरेश क्षीरसागर, रंभाजी रोहकले, साहेबराव जाधव, सेवानिवृत्त कल्याणकारी संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष दिलीप मालुसरे, सचिव प्रमोद बनसोडे, खजिनदार दीपक टिळवे तसेच विश्वासराव सोनवणे आदी उपस्थित होते. बारामती, इंदापूर, सासवड, स्वारगेट, शिवाजीनगर व भोर आगारातील चालक-वाहकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमादरम्यान रंभाजी रोहकले व विश्वासराव सोनवणे यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा केली. विशेषतः उच्च श्रेणी
पेन्शनसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पेन्शनमधील तफावत दूर करण्यासाठी आवश्यक असलेल्या अटी, शासन निर्णयांची माहिती, अर्ज सादर करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तसेच प्रलंबित प्रस्तावांबाबत पाठपुरावा कसा करावा? याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. हक्काच्या लाभांसाठी सर्वांनी संघटित राहून एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहनही करण्यात आले.
या स्नेहमेळाव्यात जुन्या सहकाऱ्यांची भेट झाल्याने अनेकांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन नियमितपणे करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळासाहेब भुजबळ, भालचंद्र भुजबळ, कैलास गायकवाड, दगडू बुनगे, गौतम भोसले, रवींद्र दुर्गाडे, बबन दुर्गाडे,
नागेश भुजबळ, वसंत शिंदे, शिवाजी पवार आदींनी परिश्रम घेतले. राजेंद्र गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. भालचंद्र भुजबळ यांनी आभार मानले.