![]()
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा २० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत राज्यभरातील ५१११ मुख्य केंद्रांवर घेतली जाईल. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ८ लाख ६५ हजार ७४० मुले, ७ लाख ४९ हजार ७३६ मुली आणि १३ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यातील २३ हजार ६८३ शाळांमधून विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यंदा अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने पार पडली. UDISE डेटाच्या आधारे शाळांची माहिती संकलित करण्यात आली. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी ९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने महत्त्वाच्या विषयांच्या पेपरांमध्ये आवश्यक खंड ठेवण्यात आला आहे. अधिकृत वेळापत्रक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले असून, विद्यार्थ्यांनी केवळ अधिकृत वेळापत्रकावरच विश्वास ठेवावा, असे आवाहन मंडळाने केले आहे. दरम्यान, परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी राज्य स्तरावर १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात दोन समुपदेशक नेमण्यात आले असून, राज्य व विभागीय मंडळ स्तरावर नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.