Wednesday, February 25, 2026
HomeNewsMartahiतटकरे-पटेल विलीनीकरणात अडथळा आणत आहेत का?:सुप्रिया सुळेंचे एकच उत्तर 'रामकृष्ण हरी'; अपघात...

तटकरे-पटेल विलीनीकरणात अडथळा आणत आहेत का?:सुप्रिया सुळेंचे एकच उत्तर 'रामकृष्ण हरी'; अपघात चौकशी, विलीनीकरण आणि राज्यसभेवर मांडली स्पष्ट भूमिका

तटकरे-पटेल विलीनीकरणात अडथळा आणत आहेत का?:सुप्रिया सुळेंचे एकच उत्तर 'रामकृष्ण हरी'; अपघात चौकशी, विलीनीकरण आणि राज्यसभेवर मांडली स्पष्ट भूमिका
पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या विमान दुर्घटनेची सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी करत सत्य बाहेर येईल, असा विश्वास व्यक्त केला. विलीनीकरणाच्या प्रश्नावर संयम राखत त्यांनी हात जोडून रामकृष्ण हरी, अशी प्रतिक्रिया दिली, तर राज्यसभेच्या चर्चेबाबत निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत होईल, असे स्पष्ट केले. रोहित पवार यांच्या अस्वस्थतेला स्वाभाविक म्हणत त्यांनी या संपूर्ण प्रकरणात राजकारण नको, तर न्याय आणि सत्य हवे, अशी भूमिका मांडली. पत्रकार परिषदेत अखेरीस सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे विलीनीकरणात अडथळा आणत आहेत का, असा थेट प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुळे यांनी हात जोडत रामकृष्ण हरी असे म्हणत प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेत मांडलेल्या मुद्द्यांवर भाष्य केले, तसेच अजितदादांच्या विमान दुर्घटनेबाबत सखोल चौकशीची मागणी पुन्हा एकदा ठामपणे मांडली. पक्षाच्या विलीनीकरणासंदर्भातही त्यांनी मोठे वक्तव्य करत सध्याच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला. पत्रकार परिषदेदरम्यान विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी संयमाने उत्तर दिले; मात्र काही ठिकाणी त्यांनी अत्यंत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. रोहित पवार यांच्या भूमिकेबाबत बोलताना सुळे म्हणाल्या की, मोठी आणि धक्कादायक घटना घडल्यावर अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. रोहित सातत्याने प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत, ही त्यांची जबाबदारीची भावना आहे. आमच्या घरात जे घडले, तसे कुणाच्याही घरात घडू नये, हीच त्यामागची भावना असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पारदर्शक पद्धतीने व्हावी, ही केवळ आमची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे, असेही त्या म्हणाल्या. ब्लॅक बॉक्समधून तांत्रिक माहिती मिळेल आणि सत्य बाहेर येईल, याबाबत मला शंका नाही, असे स्पष्ट करत त्यांनी सत्य समोर येण्याचा विश्वास व्यक्त केला. विमान दुर्घटनेच्या संदर्भात घातपाताची शक्यता आहे का, असा प्रश्न उपस्थित होत असल्यानेच आम्ही चौकशी आणि माहितीची मागणी करत आहोत, असे सुळे म्हणाल्या. दररोज नवी माहिती समोर येत असल्यामुळे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत. मात्र या विषयावर राजकारण करण्याचा आमचा हेतू नाही, हे त्यांनी ठामपणे सांगितले. आमच्या घरातील कर्ता पुरुष गेला, हा राजकारणाचा विषय नाही. दादा गेल्याचा धक्का अजूनही पचलेला नाही. आजही विश्वास बसत नाही की ते आपल्यात नाहीत. आम्ही भावनिक अवस्थेतून पुढे जात आहोत; पण त्याचवेळी संपूर्ण दुर्घटनेची चौकशी व्हायलाच हवी, ही आमची ठाम भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कामाला लागणे हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी अत्यंत संवेदनशील प्रतिक्रिया दिली. आज माझा भाऊ माझ्यासोबत नाही. माझा दादा मनाने मोठा आणि मोकळा होता. पत्रकारांशीही ते मनमोकळेपणाने बोलत असत. त्यामुळे या विषयावर आता काय बोलावे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते दुःख आमच्यासोबत आयुष्यभर राहणार आहे. आता कुणाची उणीदुणी काढून काय साध्य होणार? जे सत्य आहे ते सर्वांनाच माहिती आहे. कामाला लागणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे सुळे म्हणाल्या. आम्ही कधीच स्वतःसाठी राजकारण केले नाही. आम्ही लोकांचे सेवक आहोत. जनतेने आम्हाला निवडून दिले आहे, त्यामुळे लोकांची कामे करणे, मतदारसंघाचा विकास करणे आणि सुखदुःखात सहभागी होणे हीच आमची प्राथमिकता आहे, असे त्यांनी नमूद केले. शरद पवार राज्यसभेवर जाणार का? देशासमोरील आव्हाने आणि विकासाची कामे पूर्ण करणे या दोन्ही आघाड्यांवर आम्ही काम करत राहू, असे सांगत त्यांनी स्थानिक पातळीवर एकमेकांना साथ देण्याची भूमिका मांडली. विमान दुर्घटनेची चौकशी हा एक भाग आहे, तर देश आणि राज्याच्या प्रश्नांवर काम करणे हा दुसरा महत्त्वाचा भाग आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या आम्ही पार पाडणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यसभेच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. शरद पवार राज्यसभेवर जाणार का, या प्रश्नावर त्यांनी महाविकास आघाडी एकत्र असल्याचे सांगितले. लवकरच महाविकास आघाडीची बैठक होणार असून त्यात पुढील निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगितले. अंतिम निर्णय सामूहिक पद्धतीने होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

Tutorial de trading en gate.io on Insurance Agency Lead Scoring