25476
तंत्रशिक्षणामुळे प्रगतीचा मार्ग सुकर
अंकुश नाईक ः बांदा नाबर प्रशालेत ‘स्वाधीन’ यात्रा
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १८ ः व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘एम.एस.ए.टी.’ हा तंत्रशिक्षण देणारा विषय शिकवला जातो. हा उपक्रम स्तुत्य उपक्रम असल्याचे मत युवा उद्योजक अंकुश नाईक यांनी व्यक्त केले. नाबर स्कूलच्या ‘स्वाधीन यात्रा’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर बांदा पंचायत समिती सदस्या ऋतिका नाईक, मणेरी पंचायत समिती सदस्या सोनिया नाईक, एम.एस.ए.टी. कमिटीचे नारायण पित्रे, स्कूल कमिटी सदस्य राजेश गोवेकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई, उपमुपख्याध्यापिका शिल्पा कोरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. नाईक यांनी फीत कापून ‘स्वाधीन यात्रे’चे उद्घाटन केले.
श्री. नाईक म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना आठवीपासून उद्योगमुख शिक्षण मिळत असल्याने भविष्यात या शाळेतील विद्यार्थी उद्योजक बनणार यात शंका नाही. या विषयांतर्गत अनेक विभाग सामावलेले असल्याने विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रांतील ज्ञान पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण मिळत आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना आठवीपासूनच तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळत आहे. शाळेसाठी असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी मी निश्चितच सहकार्य करणार आहे.’’
नवनिर्वाचित बांदा पंचायत समिती सदस्य ऋतिका नाईक यांनीही मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. भूषण सावंत यांनी सूत्रसंचालन केले. राकेश परब यांनी आभार मानले. यावेळी निदेशिका गायत्री देसाई, रिया देसाई, मीनाक्षी अळवणी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.