टोकराळे आणि परिसरातील विकासाला मिळणार चालना
विकास, आरोग्य, शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगारावर रिलायन्सचे लक्ष केंद्रित
पालघर, ता. १९ : पालघरच्या केळवे रोड येथील टोकराळे भागात रिलायन्स इंडस्ट्रीजमार्फत यार्न प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प ८५० एकर क्षेत्रावर उभा राहणार आहे. प्रकल्प उभारणीआधी त्याच्या परिघातील गावांमध्ये सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमाअंतर्गत रिलायन्स इंडस्ट्रीज आणि फाउंडेशनमार्फत वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले जाणार आहेत. गावांचा विकास, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार, स्वयंरोजगार या प्रमुख बाबींवर रिलायन्सने लक्ष केंद्रित केले आहे. त्या दृष्टिकोनातून सरकारी यंत्रणांच्या मदतीने वस्तुस्थितीदर्शक आणि स्थानिकांशी चर्चा करून सर्वंकष पूर्वअभ्यास केला गेला आहे.
यार्न प्रकल्पासाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळासाठी प्रशिक्षण देण्यात येत असून, वीज तारतंत्री (इलेक्ट्रिशियन) म्हणून परिघातील गावांच्या ३० प्रशिक्षणार्थींची तुकडी पालघर आयटीआय येथे प्रशिक्षण घेत आहे. सहा महिन्यांचा हा अभ्यासक्रम असून, या तुकडीचा संपूर्ण खर्च रिलायन्स उचलणार आहे. यासह ५५ जणांना अवजड वाहनचालकाचे प्रशिक्षण दिले जात आहे. यात १७ जण टोकराळे गावातील आहेत. परिसरातील महिला स्वयंपूर्ण व्हाव्यात आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण व्हावा म्हणून ५० महिलांना रिलायन्समार्फत मोफत शिवणकाम प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर या महिलाना शिवणयंत्र आणि इतर बाबी पुरवल्या जाणार आहेत.
———————–
आयुष्यमान उद्यान उभारणार
माहीम प्राथमिक आरोग्य केंद्रातील असुविधा याचा अभ्यास करून रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा रिलायन्स फाऊंडेशनने पुरविल्या आहेत. आतापर्यंत साडेसहा लाखांच्या जवळपासच्या सुविधा केंद्राला देण्यात आल्या आहेत. पुढील टप्प्यात केळवा, वाकसई, मायखोप, बंदाठे येथील आरोग्य केंद्रातील सुविधा रिलायन्स फाउंडेशन पुरविणार आहे. फाउंडेशन गावातील आरोग्याची काळजी घेणार असून, सामुदायिक तपासणी शिबिरे, गरोदर आणि स्तनदा मातांची काळजी, आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि पायाभूत सुविधांची तरतूद बळकट करणे, आरोग्य, पोषण आणि पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देणारे ‘आयुष्मान उद्यान’ विकसित करणे असे उपक्रम भविष्यात राबवले जाणार आहेत.
प्रतिक्रिया :
केवळ प्रकल्प उभारणे हा उद्देश नसून सामुदायिक उपक्रमातून रोजगारक्षम पिढी निर्माण करून त्यांना सक्षम करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासह सामाजिक, आरोग्य, शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
दिलीप सावंत, वरिष्ठ उपाध्यक्ष, रिलायन्स इंडस्ट्रीज