जय भवानी-जय शिवाजीच्या घोषणांनी खुलताबाद शहरासह परिसर दुमदुमला:नव्या पिढीला स्वराज्याची प्रेरणा देणारा उत्सव म्हणजेच शिवजयंती‎

जय भवानी-जय शिवाजीच्या घोषणांनी खुलताबाद शहरासह परिसर दुमदुमला:नव्या पिढीला स्वराज्याची प्रेरणा देणारा उत्सव म्हणजेच शिवजयंती‎
प्रतिनिधी | खुलताबाद हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खुलताबाद तालुक्यात यंदा अभूतपूर्व उत्साह, भक्तिभाव आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. भगवे ध्वज, ढोल-ताशांचा गजर आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण तालुका दुमदुमून गेला होता. गुरुवारी सायंकाळी सुमारे सहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील विविध गावांतून शिवरायांच्या प्रतिमांच्या भव्य, आकर्षक आणि शिस्तबद्ध मिरवणुका काढण्यात आल्या. हजारो शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वातावरण शिवमय केले होते. खुलताबाद शहरासह खिर्डी, नंद्राबाद, कसाबखेडा, राजेराय टाकळी, पळसवाडी, सुलतानपूर, लामनगाव, पळसगाव, कनकशिळ आणि इतर अनेक गावांमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावागावांत भगवे ध्वज फडकत होते, रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या आणि शिवप्रेमींनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला होता. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच स्तरातील नागरिकांनी उत्सवात सहभागी होऊन शिवरायांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. मिरवणुकीदरम्यान शिवरायांच्या प्रतिमांचे विधीवत पूजन करण्यात आले. युवक मंडळे, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा निनाद आणि घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. खुलताबाद शहरातील भद्रा मारुती मंदिर, खुलताबाद प्रवेशद्वारासमोरील मोठी आळी येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष आमेर पटेल, उपनगराध्यक्ष नवनाथ बारगळ, नगरसेवक योगेश फुलारे, योगेश बारगळ, दिलीप बावस्कर यांच्यासह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते. खिर्डी येथे कार्यक्रमांची रंगत खिर्डी येथे माजी सरपंच ज्ञानेश्वर मातकर यांच्या पुढाकाराने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गावातील जुनी ग्रामपंचायतसमोर शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित नृत्य, गीत आणि ऐतिहासिक देखावे सादर केले. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त मिरवणुकीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती. पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली संवेदनशील भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक व्यवस्था, मिरवणुकीचे मार्ग आणि सुरक्षा यांचे काटेकोर नियोजन होते. २५ पेक्षा अधिक गावांतून मिरवणुका तालुक्यातील २५ पेक्षा अधिक गावांतील युवक मंडळे आणि शिवप्रेमींनी मिरवणुकीसाठी खुलताबाद पोलीस ठाण्याकडे परवानगी अर्ज सादर केले होते. युवक मंडळांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुका आयोजित केल्या. ढोल-ताशा पथकांचा गजर, लेझीम पथके, भगवे ध्वज आणि आकर्षक देखावे यामुळे मिरवणुका अधिक भव्य आणि आकर्षक ठरल्या.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart