‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी दुमदुमला परिसर:डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाची मिरवणूक ठरली लक्षवेधी‎

‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी दुमदुमला परिसर:डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाची मिरवणूक ठरली लक्षवेधी‎
प्रतिनिधी | अमरावती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शौर्य, धैर्य आणि न्यायनिष्ठेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, अमरावती यांच्या वतीने अत्यंत दिमाखदार शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. “जय भवानी, जय शिवाजी”च्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण शिव परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाची सुरुवात श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे सदस्य हेमंत काळमेघ, प्राचार्या डॉ. वर्षा देशमुख, प्राध्यापकवर्ग, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यानंतर मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालावर आणि भगव्या पताकांच्या फडक्यात परिसर अक्षरशः भारावून गेला होता. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत शिवकालीन परंपरा जिवंत केल्याचा अनुभव दिला. काही विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज, जिजाऊ माता, मावळे यांची वेशभूषा परिधान करून इतिहासाचे सजीव दर्शन घडवले. प्राचार्या डॉ. वर्षा देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगतात शिवाजी महाराजांच्या आदर्शांचा आजच्या काळातील संदर्भ स्पष्ट केला. विद्यार्थ्यांना केवळ उत्सव साजरा न करता शिवरायांच्या विचारांचे आचरण जीवनात उतरवण्याचे आवाहन दिलीप इंगोले यांनी आपल्या उद्घाटन भाषणातून श्री शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत तरुणाईने राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा, असा संदेश दिला. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सदस्य हेमंत काळमेघ यांनी सांगितले की शिवजयंती उत्सव हा केवळ ऐतिहासिक स्मरणाचा दिवस नसून स्वाभिमान, धैर्य आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारा सोहळा आहे. शिवरायांच्या विचारांची ज्योत तरुणांच्या मनात प्रज्वलित ठेवण्याचा आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा संदेश या उत्सवातून दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे महाविद्यालयाची शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होत असल्याची भावना नागरिक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन अंजली इंगळे व आभार प्रदर्शन प्रफुल्ल घवळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता शिवजयंती उत्सव समितीच्या विद्यार्थ्यांनी आता परिश्रम घेतले. डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या छत्रपती श्री.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. मर्दानी खेळ, लाठी-काठीच्या प्रयोगाचे ठरले आकर्षण मिरवणुकीदरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेले मर्दानी खेळ, लाठी-काठीचे थरारक प्रयोग, तलवारबाजीचे प्रात्यक्षिक आणि पारंपरिक युध्दकौशल्याचे सादरीकरण विशेष आकर्षण ठरले. या प्रात्यक्षिकांमधून शिवकालीन शौर्य आणि पराक्रमाचे दर्शन घडले. उपस्थित नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या धाडसी आणि शिस्तबध्द सादरीकरणाचे जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart