
प्रतिनिधी | तिवसा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेले हे शिबिर अत्यंत महत्वपूर्ण आहे. कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी कसे वागले पाहिजे, हे सुद्धा यातून शिकलो पाहिजे. जनतेच्या तक्रारी समजून घेऊन त्यांना प्रामाणिकपणे वागणूक देऊन निवारण केले पाहिजे. एका-एका निवेदनाचे उत्तर आपण दिले पाहिजे. ग्रामपातळीवर काम करणाऱ्या प्रत्येक विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी जनतेशी जबाबदारीने वागून चर्चेतून किंवा लेखी स्वरूपातून तक्रारी सोडवाव्यात. असे अमूल्य मार्गदर्शन अमरावती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त उपमुख्यकार्यकारी अधिकारी विनय ठमके यांनी आज तिवसा येथे केले. तहसील कार्यालय तिवसा येथे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून आयोजित जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी दादासाहेब दराडे तसेच तहसीलदार डॉ.मयुर कळसे, गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे, तालुका कृषी अधिकारी इंगळे आदी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब दराडे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतांना आपण जनतेसाठी आहोत. त्यामुळे काम करीत असताना स्वतः मध्ये बदल घडवून आणावा व बदलानुसार जर बदलत राहिलो तरच आपण चांगले काम करू असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन व आभार काकडे यांनी केले. कार्यक्रमाला नायब तहसीलदार आशिष नागरे, नरेंद्र कुरळकर, देशमुख, सहाय्यक गटविकास अधिकारी नारायण अमझरे, गटशिक्षणाधिकारी नितीन उंडे तसेच सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.