
प्रतिनिधी|अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये ‘स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना’ आणि ‘छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समिती’ यांनी विचारांची मशाल पेटवली. मागील १७ वर्षांपासून १८ फेब्रुवारी रोजी जनजागृतीपर शिवजयंती साजरी करून या संस्थांनी समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार केवळ घोषणांपुरते मर्यादित न ठेवता ते विद्यार्थी आणि तरुणांच्या मनात रुजवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. १८ फेब्रुवारीला जनजागृती करून १९ फेब्रुवारीच्या शासकीय शिवजयंती उत्सवात समाजाने मोठ्या संख्येने आणि शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी व्हावे, ही यामागची मूळ संकल्पना आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात महापौर ज्योती गाडे उपस्थित होत्या. ‘गेल्या १७ वर्षांपासून सुरू असलेला हा सातत्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद आहे. या कार्यासाठी माझ्या कार्यकाळात आवश्यक तो विकास निधी उपलब्ध करून दिला जाईल,’ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. उपमहापौर धनंजय जाधव यांनीही या उपक्रमाला पाठबळ दर्शवले. ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्राचे काम आता अंतिम टप्प्यात असून, या विधायक कार्यासाठी निश्चित योगदान दिले जाईल,’ असे त्यांनी सांगितले. नगरसेवक संपत बारस्कर यांनी संस्थेच्या १७ वर्षांच्या प्रवासाचा आणि उल्लेखनीय सामाजिक कार्याचा आढावा घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज गुंड यांनी केले, तर उपस्थितांचे आभार करण कराळे यांनी मानले. याप्रसंगी शहरातील अनेक मान्यवर, इतिहासप्रेमी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्वांनी मिळून निर्माणाधीन विद्यार्थी सहाय्यता केंद्राच्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण आणि विचार रुजवण्यावर भर देण्यात येणार आहे. विद्यार्थी सहाय्यता केंद्राच्या कामाची मान्यवरांकडून प्रत्यक्ष पाहणी यावेळी करण्यात आली. कार्यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य आवश्यक हे वैचारिक कार्य पुढे नेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी साथ द्यावी. तसेच, स्मारकाच्या सुरक्षेसाठी पूर्णवेळ रात्र कर्मचारी नियुक्त करावे, असे आवाहन यशवंत तोडमल यांनी प्रशासनाकडे केले.