Monday, March 23, 2026
HomeNewsMartahiछत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक:पोलीस बँड पथकाचे महाराष्ट्र गीत अन् शिव...

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक:पोलीस बँड पथकाचे महाराष्ट्र गीत अन् शिव आरतीने दुमदुमला परिसर, नागरिकांचीही अलोट गर्दी‎

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक:पोलीस बँड पथकाचे महाराष्ट्र गीत अन् शिव आरतीने दुमदुमला परिसर, नागरिकांचीही अलोट गर्दी‎
प्रतिनिधी|अहिल्यानगर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ, जिल्हा प्रशासन आणि अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, उपमहापौर धनंजय जाधव, विश्वासराव आठरे, प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या हस्ते शिव आरती करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर पोलीस बँड पथकाने महाराष्ट्र गीताने मानवंदना दिली. हभप सिद्धनाथ मेटे महाराज यांच्या मंत्रोच्चाराने महापूजा पार पडली. यानंतर पारंपरिक मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित देखावे, विद्यार्थ्यांची ऐतिहासिक वेशभूषा, गुरुजनांचा सहभाग, तसेच मराठा साम्राज्याच्या पराक्रमाचे दर्शन घडविणारे रथ हे नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभे असलेल्या नागरिकांनी “जय शिवराय”च्या घोषणा देत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. याप्रसंगी आमदार जगताप म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे प्रेरणेचा अखंड स्रोत आहे. त्यांच्या कार्यातून आपण ऊर्जा आणि धैर्य मिळवतो. युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या जीवनात आचरणात आणावा. शौर्य, संघटन आणि स्वाभिमान या तत्त्वांवर उभे राहून देश आणि समाजाची सेवा करावी. जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करून इतिहास जिवंत ठेवला आहे. महापौर गाडे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपुरुष होते. त्यांचा प्रत्येक निर्णय लोकहितासाठी होता. त्यांच्या आदर्शांवर चालणारे तरुणच महाराष्ट्राला अधिक बळकटी देतील. शहरातील युवकांनी इतिहास जाणून घेत समाजकार्यात सहभागी व्हावे, हाच खरा त्यांचा अभिवादनाचा मार्ग आहे. मिरवणुकीत विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, महिला मंडळ, सामाजिक संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. संपूर्ण मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजराने आणि भगव्या झेंड्यांच्या लहरीने वातावरण भारुन गेले होते. कार्यक्रमास नगरसेवक प्रकाश भागानगरे, गीतांजली काळे, माया कोल्हे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, परिमल निकम, अॅड. शिवाजी कराळे, सुरेश इथापे, चंद्रकांत गाडे, जयंत वाघ, शहर अभियंता मनोज पारखे, श्रीकांत निंबाळकर, महादेव काकडे आदींसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांकडून ठिकठिकाणी स्वागत शहरातील प्रमुख मार्गांवरुन मिरवणूक काढण्यात आली. नागरिकांनी या रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. तसेच नागरिकांनी ठिकठिकाणी या मिरवणुकीचे स्वागतही केले. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत नागरिकांनी या मिरवणुकीचे स्वागत केले. या मिरवणुकीत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments