चंद्रशेखर बावनकुळे

कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक
चंद्रशेखर बावनकुळेः जिल्हा बँक गैरव्यवहाराची चौकशी होणार
सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. २०ः सहकार कायद्यात गरीब शेतकऱ्यांची पिळवणूक झाल्याची कबुली देत गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. नागपूर जिल्हा सहकारी बँकेत बाराशे कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराबाबतही सरकार गंभीर असून याची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
बावनकुळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पुढील तीन महिने ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांत नागरिकांना १५ प्रकारच्या सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सरकार गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने काम करणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. नवीन नागपूरसाठीचे भूसंपादन पॅकेज उत्कृष्ट असल्याचे सांगत याआधी भूसंपादनानंतर भूखंड मिळत नसत; मात्र आता कमर्शिअल क्षेत्रात प्लॉट देण्याची तरतूद करण्यात आली आहे. जमीन अधिग्रहण कायद्यान्वये योग्य मोबदला आणि भूखंड देण्यात येणार असल्याने अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ते म्हणाले. शेती, रोजगारनिर्मिती आणि इतर सर्व क्षेत्रांत नागपूर जिल्हा अग्रगण्य राहील, यासाठी प्रशासनाने काम सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले. मतदार यादीतील त्रुटींवर बोलताना आदर्श यादी तयार करण्यासाठी आवश्यक तेवढा निधी सरकार उपलब्ध करून देईल, असे बावनकुळे यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असल्याने वाळू तस्करीवर आळा बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विभागीय आयुक्तांच्या देखरेखीखाली वाळू चोरी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart