गोंदवल्यात भावनिक सोहळा

कामांची खंत, मतभेदांची माफी मागत भावनिक निरोप

गोंदवले बुद्रुक ग्रामपंचायतीच्‍या सदस्‍यांची शेवटची मासिक बैठक; सदस्‍यांचाही सन्‍मान

गोंदवले, ता. २० : गेली पाच वर्षे ग्रामपंचायत सभागृहातील चर्चांनी दणाणून जाणारे वातावरण आज मात्र पूर्णपणे भावनिक बनले होते. नेहमी ठाम आवाजात बोलणाऱ्या सदस्यांचा कंठ दाटून आला होता. डोळ्यांत पाण्याची चमक होती आणि मनात अपूर्ण कामांची खंत आणि सहकाऱ्यांविषयी कृतज्ञतेची भावना दाटून आली होती.
निमित्त होते ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्याने आयोजित केलेल्या सदस्यांच्या सन्मान सोहळ्याचे. गोंदवले बुद्रुकच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेल्या या आगळ्यावेगळ्या सोहळ्याने आज (शुक्रवार) सर्वजण भारावून गेल्याचे पाहायला मिळाले.
२०२० मध्ये स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यकारिणीचा पाच वर्षांचा कालखंड येत्या रविवारी (ता. २२) पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर या कार्यकारिणीची आज शेवटची मासिक बैठक ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयप्रकाश कट्टे होते. यावेळी उपसरपंच संजय माने तसेच सर्व सदस्य उपस्थित होते. या शेवटच्या बैठकीत सर्वच सदस्यांनी मनमोकळेपणाने आपले विचार व्यक्त केले.
बैठकीनंतर ग्रामपंचायत अधिकारी संतोषकुमार माळवे यांनी सर्वच सदस्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. कार्यकाळात केलेल्या कामांचा गौरव व्हावा, या उद्देशाने आयोजित या आगळ्यावेगळ्या सोहळ्याने सर्वजण भारावून गेल्याचे पाहायला मिळाले. श्री. माळवे यांच्या हस्ते सदस्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देण्‍यात आले.
यावेळी श्री. कट्टे म्हणाले, ‘‘सुरुवातीच्या कोविडच्‍या काळात सर्वांच्या सहकार्याने गाव सुरक्षित राखण्यात मोलाची मदत झाली. या कार्यकाळात गावाच्या विकासासाठी योगदान देता आले, याचा अभिमान आहे.’’ उपसरपंच संजय माने भावनिक होत म्हणाले, ‘‘गेल्या तीस वर्षांत ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीच्या प्रत्यक्ष कामकाजात सहभागी होऊन गावाची विकासकामे करता आली, याचा आनंद आहेच. भविष्यातही ग्रामपंचायतीमध्ये असो वा नसो गावाच्या भल्यासाठी कायम कार्यरत राहण्याचा प्रयत्न करणार आहे.’’
……………………………….
विचार जपूच, नातीही टिकवू
आपण जे करू शकलो नाही, त्याची खंत आहे; पण गावाने आम्हाला दिलेल्या संधीबद्दल आम्ही ऋणी आहोत, असे सांगताना अनेकजण भावुक झाले. काहींनी वैचारिक मतभेदांच्या काळातील क्षण आठवत एकमेकांची माफी मागितली. कार्यकाळात विचार भिन्न असू शकतात; पण नाती मात्र नेहमीच जपली पाहिजेत, अशा भावना यावेळी व्यक्त झाल्या.
—————————
छायाचित्र :………….02569
गोंदवले बुद्रुक : कार्यकाळ संपत आल्‍याने ग्रामपंचायत सदस्यांचा सन्‍मान करताना संतोषकुमार माळवे. समवेत अन्‍य मान्‍यवर. (फिरोज तांबोळी : सकाळ छायाचित्रसेवा)
……………………………………

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart