गॅस बिलांच्या निमित्ताने आर्थिक फसवणूक जोरावर
पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून कोट्यवधींचा गंडा; पोलिसांचे सतर्कतेचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ ः वाहतूक पोलिसांच्या नावे बोगस ई-चलानांनंतर आता सायबर भामट्यांनी महानगर गॅस लिमिटेड कंपनीच्या नावे फसवे मेसेज पाठवून नागरिकांची आर्थिक फसवणूक आरंभली आहे.
गेल्या दोन महिन्यांत असे फसवे मेसेज पाठवून बिल न भरल्याने गॅसपुरवठा रातोरात खंडित करू, अशी भीती घालत फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. सुरुवातीला दोन ते पाच लाखांपर्यंतची फसवणूक अलीकडच्या काही दिवसांमध्ये १४ ते २० लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः मोबाईल क्रमांकावरून येणारे मेसेज, व्हॉट्सॲप समूहावर येणाऱ्या लिंकबाबत कायमस्वरूपी काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नागरिक सहज कसे जाळ्यात येतील, याचा अभ्यास सायबर भामटे सातत्याने करत असतात. त्यामुळे एक झाले की दुसरे, नवे निमित्त शोधून नागरिकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न भामट्यांकडून निरंतर सुरू असतो. एपिके फाइल पाठवून त्याद्वारे भामटे नागरिकांच्या मोबाईलचा परस्पर ताबा मिळवतात. ताबा मिळाला की ऑनलाइन बँकिंग तपशील, ओटीपीद्वारे नागरिकांच्या बँक खात्यावरील पैसे परस्पर इतरत्र वळवतात. फसवणुकीची हीच मुख्य पद्धत आहे. सुरुवातीला भामट्यांनी बोगस ई-चालनद्वारे नागरिकांना एपिके फाइल पाठवल्या. ज्यांनी त्या क्लिक केल्या, उघडल्या त्यांची फसवणूक झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ई-चलानचे फसवे संदेश खऱ्या चलानाशी मिळते जुळते होते. बारकाईने पाहिल्यास त्यातील फरक जाणवत असे. ई-चलानद्वारे फसवणूक सुरू असतानाच अलीकडे महानगर गॅस कंपनीचे नाव वापरून भामटे नागरिकांना फसवे मेसेज आणि त्याद्वारे एपिके फाइल पाठवत आहेत.
सर्वसाधारणपणे महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून ग्राहकांना येणारे सर्व प्रकारचे मेसेज एक्स – एमजीएलएलटीडी या नावे प्राप्त होतात. उदाहरणार्थ गॅस मीटरचे रीडिंग घेण्यासाठी अमुक नावाचा अधिकारी तमुक वेळी येईल, या महिन्याचे गॅस बिल इतके असून, या तारखे आधी ते भरावे. मात्र, भामट्यांकडून येणारे फसवे मेसेज खासगी नंबरवरून प्राप्त होतात किंवा खासगी मोबाईल क्रमांकावरून कॉल करून भामटे स्वतःला महानगर गॅस कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवतात.
गॅसपुरवठा अबाधित ठेवण्यासाठी क्षणाचाही विचार न करता, कोणतीही पडताळणी न करता नागरिक फसव्या मेसेजमधील एपिके फाइल उघडतात, आपले तपशील भरतात. सुरुवातीला या प्रकारच्या फसवणुकीत अनेकांचे एक ते दोन लाख रुपये भामट्यांनी परस्पर स्वतःच्या खिशात घातले. आता फसवणूक रक्कम १५ ते २० लाखांपर्यंत पोहोचली आहे.
फसवणूक प्रकरणे
– ६ फेब्रुवारी रोजी गोरेगाव येथे राहणाऱ्या मुकेश पटेल (५५) यांना या फसव्या मेसेजद्वारे एपिके फाइल पाठवून १४.७९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. त्यांच्या व आईच्या नावे असलेल्या तीन खात्यांवरून ही रक्कम भामट्यांनी परस्पर हिसकावली.
– कांदिवली येथे राहणाऱ्या कमलेश शहा यांना गॅसपुरवठा खंडित होईल, अशी भीती घालून १० लाखांना फसवण्यात आले.
– ९ फेब्रुवारीला मालाड येथे राहणाऱ्या माला कृष्णन या सेवानिवृत्त वृद्धेस गॅसपुरवठा खंडित करण्याच्या निमित्ताने १२.७१ लाखांचा गंडा घालण्यात आला. मुलाने बिल भरले असून, तुम्ही खुशाल पुरवठा खंडित करा, असे सुरुवातील माला यांनी सांगितले होते. मात्र, भामट्यांनी बोलण्यात गुंतवून त्यांना एपिके फाइल उघडण्यास भाग पाडले. त्यांच्या व मुलाच्या खात्यावरील रक्कम हिसकावली.