वडगाव मावळ, ता. १९ : मावळ पंचायत समिती, उमेद अभियान व ग्रामीण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कौशल्य मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात सुमारे ३५० महिलांनी सहभाग घेतला.
तळेगाव स्टेशन येथील जनरल हॉस्पिटलच्या रिक्रिएशन हॉलमध्ये हा मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी रुडसेट संस्थेचे संचालक राजकुमार बिरादार होते. गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, रोटरी क्लबचे सचिव संजय मेहता, सनदी लेखापाल माधुरी सस्ते, उमेदचे तालुका व्यवस्थापक सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते. मेळाव्यात ग्रामीण युवक-युवतींना उद्योजकता विकास, स्वयंरोजगाराच्या संधी, बँक कर्ज प्रक्रिया, शासनाच्या विविध योजना तसेच नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्क मानांकन प्राप्त प्रशिक्षण अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली.
बिरादार यांनी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध निवासी व अनिवासी विनामूल्य प्रशिक्षण उपक्रमांची माहिती देत बँकांच्या साहाय्याने स्वतःचा उद्योग कसा उभारावा याबाबत मार्गदर्शन केले. गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी युवक-युवती व महिलांना जास्तीत जास्त नोंदणी करून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा व आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी असे आवाहन केले. मेहता यांनी स्वतःच्या अनुभवातून छोट्या व्यवसायातून मोठा उद्योग कसा उभा करता येतो, याची प्रेरणादायी उदाहरणे देत उद्योजकतेचे महत्त्व पटवून दिले. माधुरी सस्ते यांनी व्यवसायासाठी आवश्यक कागदपत्रे, नोंदी व आर्थिक शिस्त यांचे महत्त्व स्पष्ट केले. सर्व कागदपत्रे पूर्ण व सुव्यवस्थित असल्यास व्यवसायातील नफा-तोटा अचूक समजून घेता येतो, असे त्यांनी सांगितले. सुरेश गायकवाड यांनी अभियानांतर्गत विविध उपक्रमांची माहिती देत महिला सक्षमीकरणासाठी स्वयंरोजगाराचे महत्त्व अधोरेखित केले. कॅनरा बँकेचे मुख्य व्यवस्थापक जंगले यांनी बँकेच्या विविध कर्ज योजना, शासकीय अनुदान व विमा योजनांची माहिती देत उद्योजकांना बँकिंग साहाय्य कसे मिळते हे स्पष्ट केले. या वेळी उमेद अभियानाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या शोभा आहेर यांनी आपल्या जीवनातील सकारात्मक बदलाचा अनुभव कथन केला. तसेच सध्या मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी शिवकुमार यांनी संस्थेत मिळणाऱ्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यात यशस्वी उद्योजक बनण्याचा विश्वास व्यक्त केला. संदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. दिनेश निळकंठ यांनी सूत्रसंचालन केले. हरीश बावचे यांनी आभार मानले. अभिजित राठोड, लक्ष्मण मदगुल, सुभाष गायकवाड, रवींद्र गांगुर्डे, मोहिनी लाखे, विद्या भंडारे, शीतल सोनचे यांनी संयोजन केले.