कोकणची संस्कृती राज्याबाहेरही पोहोचली पाहिजे
रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : मालवणी महोत्सवातून केवळ खाद्यसंस्कृतीच नव्हे तर कोकणातील कला आणि परंपरेलाही बळ मिळत असून या माध्यमातून रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे कोकणची ही समृद्ध संस्कृती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता देशभर पोहोचली पाहिजे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले.
कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने शिवाई नगरमधील उन्नती गार्डन मैदानात अजित पवार महोत्सव नगरीत आयोजित मालवणी महोत्सवाला रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी (ता. १९) भेट दिली. याप्रसंगी उपमहापौर कृष्णा पाटील, आयोजक नगरसेवक सीताराम राणे, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले, गटनेते मुकेश मोकाशी आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी रविंद्र चव्हाण यांनी उपस्थितांना संबोधित केले. पारंपरिक कोकणी खाद्यसंस्कृती, शेती उत्पादने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सीताराम राणे करत असल्याबद्दल कौतुक केले.
गेली २७ वर्षे मालवणी महोत्सव घेणे ही कोकण वासियांसाठी महत्वपूर्ण बाब आहे. खाद्यसंस्कृती व कला संस्कृतीसोबतच कोकणातील विविध मसाले, लोणची, आंबा उत्पादने, काजू, पारंपरिक पदार्थाची वर्षभराची बेगमी शहरवासियांना अशा महोत्सवातून करता येते. तसेच, एकप्रकारे रोजगाराच्या मोठ्या संधी अशा महोत्सवाच्या माध्यमातून मिळते, असे त्यांनी म्हंटले आहे. यावेळी सीताराम राणे यांनी, कोकणातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू व पारंपरिक मालवणी खाद्यपदार्थांची परडी देऊन रविंद्र चव्हाण यांचा सत्कार केला.