नवी मुंबई एमआयडीसीमध्ये ऑनलाइन सेवांमुळे उद्योजकांना दिलासा
वाशी, ता. १९ (बातमीदार) ः महापे येथील एमआयडीसी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आलेल्या व्यापक ऑनलाइन सेवांमुळे नवी मुंबईतील टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, लघु-मध्यम उद्योगधारक आणि प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यामुळे आता उद्योजकांना मुंबईतील मुख्य कार्यालयात चकरा मारण्याची गरज उरणार नाही. परिणामी, वेळ, पैसा आणि मनस्ताप वाचणार असून उद्योग करणे अधिक सुलभ झाले आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्योगांशी निगडित प्रक्रिया अधिक सोप्या, पारदर्शक आणि वेळबद्ध करण्यासाठी ऑनलाइन सेवा प्रणाली कार्यान्वित केली आहे. याचा थेट लाभ टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना मिळत आहे. महापे येथील एमआयडीसी कार्यालयामार्फत उद्योजकांना सध्या नवीन नळजोडणी, पाणी वापरात बदल, अर्जदाराच्या नावात बदल, नाहरकत प्रमाणपत्र, सांडपाणी जोडणी, उत्पादन प्रक्रियेत बदलास परवानगी, डीओसी (डिग्री ऑफ ऑक्युपन्सी), साईट ऑफ वे, बांधकाम सुरू करण्यासाठी सूचना, अग्निशमन व हरित प्रमाणपत्राशी संबंधित विविध सेवा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सेवा घरबसल्या पूर्ण करता येत आहेत. याशिवाय औद्योगिक व व्यावसायिक भूखंड वाटप, भूखंडांचे एकत्रीकरण व विभाजन, भाडेकरार नूतनीकरण, परवाने अद्यायावत करणे, काही विकास परवानग्या यादेखील डिजिटल प्रणालीद्वारे जलदगतीने हाताळल्या जात आहेत. त्यामुळे कामकाजातील अनावश्यक विलंब टळत असून पारदर्शकता वाढली आहे. विशेषत: नव्याने उद्योग सुरू करणाऱ्या उद्योजकांसाठी ही व्यवस्था अत्यंत उपयुक्त ठरत आहे.