सोमेश्वरनगर, ता. १९ : लपतळवाडी (ता. पुरंदर) येथे मातृदेवतेचा तीन दिवसीय ‘लिमजाई माता यात्रा उत्सव’ विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे पार पडला. या निमित्ताने भजन, कीर्तन, छबिना, तमाशा, ढोल-ताशा स्पर्धा पार पडल्या.
बहुतांश गावात भैरवनाथ, पीरबाबा यांच्या यात्रा-जत्रा होतात. लपतळवाडी गावात मात्र लिमजाई माता या मातृदेवतेचा यात्रा उत्सव आयोजित करण्याची परंपरा आहे. उत्सवात रविवारी (ता. १५) पांडुरंग महाराज यांची कीर्तनसेवा आणि श्रीनाथ भजनी मंडळ पथकाचे भजन पार पडले. सोमवारी लिमजाई मातेस वाड्यावस्त्यावरील ग्रामस्थांनी पूजा, अभिषेक, दंडवत याद्वारे वंदन केले. सोमवारची संपूर्ण रात्र ग्रामस्थांनी परंपरेप्रमाणे जागून काढली. सुरवातीला छाया खिलारे-बाारामतीकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा तमाशा पार पडला. यानंतर दोन ते सहा या वेळेत पुणे व सातारा जिल्ह्यातून आलेल्या अठरा ढोलताशा मंडळाने आपापले खेळ सादर केले. ग्रामस्थांनी त्याला भरभरून बक्षीसे दिली.
खेळ संपल्यानंतर लिमजाई मातेच्या पालखीची आणि काठीची मिरवणूक गुलालाच्या उधळणीत पार पडली. मंगळवारी बाबूराव कांबरेकर लोकनाट्य पारंपरिक तमाशा पार पडला. यानंतर यात्रा उत्सवातच ग्रामस्थ मंडळाच्या वतीने सन्मान सोहळा झाला. यामध्ये पनवेल महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आल्याबद्दल रामदास शेवाळे यांचा तर पुरंदर पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल प्रवीण जगताप यांचा सत्कार करण्यात आला. मांडकी विद्यालयास संगणक प्रणाली दिल्याबद्दल अभियंता राहुल गुरव, ॲड. नवनाथ जगताप यांचा तर गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केल्याबद्दल सोमेश्वर शिक्षण मंडळाचे सचिव भारत खोमणे यांना मच्छिंद्र पिलाणे, वसंत पिलाणे, संजय शेरे आदींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी रवींद्र पिलाणे, काशिनाथ पिलाणे, सचिन शेटे, आत्माराम यादव, विष्णू पिलाणे, नितीन पिलाणे, चतर पिलाणे, देविदास मोरे उपस्थित होते. प्रा. कुंडलिक कदम यांनी प्रास्ताविक केले. महादेव पिलाणे यांनी सूत्रसंचालन तर सतीश बिरामणे यांनी आभार मानले.