
प्रतिनिधी | आमठाणा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आमठाणा येथे मोठ्या उत्साहात साजरी झाली. शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज, जिजाबाई यांची वेशभूषा साकारली. गावातून पालखी मिरवणूक काढली. वेशभूषेमुळे मिरवणुकीत विशेष आकर्षण निर्माण झाले. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक निघाली. गावातील माता-भगिनींनी शिवाजी महाराज, जिजाऊंच्या वेशभूषेचे पूजन केले. औक्षण केले. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी आमठाणा, परिसर दुमदुमला. मिरवणुकीनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ पुतळ्यास शिव समितीचे अध्यक्ष गणेश बाविस्कर यांनी पुष्पहार अर्पण केला. ध्वज फडकावला. उपाध्यक्ष नागेश मोरे, कार्याध्यक्ष संदीप वाघ, सचिव सचिन गवते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन केले. ध्वजारोहण केले. जिजाऊ वंदना झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती झाली. आमठाणा येथील विविध शाळांतील लहान विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित छोट्या नाटिका सादर केल्या. उपस्थित गावकऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी, आजी-माजी सैनिक, महिला-पुरुष, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.