डिजिटल शिक्षणाद्वारे साधा गुणवत्ता विकास
इंद्रजित देशमुख; दिवड शाळेत डिजिटल एआय-स्किल लॅब
म्हसवड, ता. २० : गावातील गट- तट विसरून आधुनिक काळातील डिजिटल शिक्षण पद्धतीला प्राधान्य देऊन विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास साधावा, असे आवाहन माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी केले.
दिवड (ता. माण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वेदांता फाउंडेशन व ग्रामस्थांच्या सहकार्याने झालेल्या डिजिटल एआय व स्कील लॅबच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
माणचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, केंद्रप्रमुख नंदकुमार तुपे, शिक्षक बँकेचे संचालक विजय बनसोडे, डॉ. चंद्रकांत साबळे, डॉ. सावंत, सरपंच अर्चना सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब काटकर, ग्रामविकास अधिकारी श्री. गंबर, कोळेकर आदी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, ‘‘मुख्याध्यापक बालाजी जाधव यांनी शाळेसाठी योगदान दिले असून, शाळेचा विकास करण्याचा ध्यास घेतला आहे. यातून त्यांनी भविष्यातील विद्यार्थी विविध आव्हाने पेलतील, असे विद्यार्थी तयार करण्यासाठी सहकारी शिक्षकांच्या मदतीने शाळेचे गुणवत्ता विकासाकडे वाटचाल चालू आहे. जीवनात ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मुलांनी स्पर्धेचे आव्हान पेलावे व भविष्याचा वेध घेऊन डिजिटल क्रांती करून जीवनात यशस्वी व्हावे. समाजात सज्जन, विद्वान, सेवाभावी व महाजन या चार प्रकारची माणसे असतात. त्यांना विचाराची दिशा दिली, की समाज परिवर्तन घडते. समाजाचा विकास साधायचा असेल, तर गावात वैचारिक परिवर्तन झाले पाहिजे.’’ राजकारण बाजूला ठेवून ज्ञानमंदिर घडवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
श्री. पिसे म्हणाले, ‘‘दिवड येथील शाळेने भरारी घेत मुलांचा शैक्षणिक विकासाबरोबरच भविष्यातील डिजिटल क्रांतीचा विकास केला आहे. खेड्यातील प्रत्येक मुलाला गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळण्यासाठी समाज व शिक्षकांनी पुढे येऊन गावाचा शैक्षणिक विकास करावा
मुख्याध्यापक बालाजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास सहकारी शिक्षक हणमंत शेळके, विष्णुदास बिरादार, पांडुरंग सगर, शिक्षक प्रताप आडसर, शिक्षक बँकेचे संचालक विजय बनसोडे, सुशील त्रिगुणे, बालविकास प्रकल्प अधिकारी कोळेकर, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
B02385
दिवड ः प्राथमिक शाळेत डिजिटल एआय व स्किल लॅब उद्घाटन कार्यक्रमात बोलताना इंद्रजित देशमुख. त्या वेळी मान्यवर.
………………………..