
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त आझम कॅम्पस शैक्षणिक परिवारातील विविध संस्थांतर्फे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट, महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट, डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठ आणि अवामी महाज सामाजिक संस्था यांचा सहभाग होता. प्रा. इरफान शेख, प्रा. मुजफ्फर शेख, डॉ. नाझीम शेख, अफझल खान, आसिफ शेख, डॉ. एम. ए. लाहोरी, धनंजय पालणे यांच्यासह आझम कॅम्पस अंतर्गत सर्व संस्थांचे प्राचार्य, संचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि आदर्शांचा गौरव करत त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प केला. राष्ट्रभक्तीपर वातावरणात शिवरायांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. दरम्यान, सरसेनापती हंबीरराव मोहिते स्वराज्य रथ समिती, पुणे यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त अनोखा संदेश देणारा स्वराज्यरथ सोहळा आयोजित करण्यात आला. फरासखानासमोर मान्यवरांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले. यावेळी ‘व्यसनरूपी राक्षसावर शिवविचारांचा प्रहार करूया’, ‘सुसंस्कृत स्वराज्यासाठी व्यसनमुक्त समाज घडवूया’, ‘व्यसनाचा अफजल पराभूत होईल विचारांच्या वाराने, उज्ज्वल भविष्य घडेल शिवशक्तीच्या आधाराने’ असे फलक रथावर झळकले. शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्य घडवताना व्यसनाधीनतेच्या राक्षसाला शिवविचारांनी फाडण्याचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्त कृष्णकांत पिंगळे, बेळगावचे महापौर मंगेश पवार, डॉ. मिलिंद भोई, नगरसेविका स्वप्नाली पंडित यांच्यासह सरदार पवार घराणे आणि सरदार पायगुडे घराण्यातील सदस्य उपस्थित होते. समितीचे जयाजी मोहिते, ऍड. सुभाष मोहिते, शिरीष मोहिते, दत्ता मोहिते, संदीप मोहिते, प्रशांत मोहिते, विक्रांत मोहिते, रोहन मोहिते, सागर मोहिते, प्रकाश मोहिते, दिनेश मोहिते, रामेश्वर मोहिते आदींनी या सोहळ्याचे संयोजन केले. उपस्थितांनी शिवरायांच्या स्वराज्याला व्यसनमुक्त आणि सुसंस्कृत करण्याचा निर्धार केला.