एक लाख १९ हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा
कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक परीक्षा केंद्रे; कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासनाकडून ‘वॉच’
ठाणे, ता. १९ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित दहावीच्या परीक्षांना शुक्रवार (ता. २०)पासून सुरुवात होत आहे. ठाणे जिल्ह्यातून यंदा एकूण एक लाख १९ हजार ७४२ विद्यार्थी ही परीक्षा देणार असून, शिक्षण विभागाने ३२६ परीक्षा केंद्रांवर सर्व जय्यत तयारी पूर्ण केली आहे.
गुरुवारपासूनच जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर आसन क्रमांक लावणे आणि बैठक व्यवस्था तपासण्याची लगबग सुरू होती. अनेक विद्यार्थ्यांनी गुरुवारी (ता. १९) दुपारीच परीक्षा केंद्रांवर जाऊन आपल्या आसन क्रमांकाची खातरजमा केली. जिल्ह्यातील एकूण परीक्षा केंद्रांपैकी सर्वाधिक ८२ केंद्रे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात आहेत. संपूर्ण परीक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी २० परिरक्षक केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.
सहा भरारी पथके तैनात
परीक्षा पारदर्शक आणि ‘कॉपीमुक्त’ वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष खबरदारी घेतली आहे. जिल्ह्यात सहा विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल. डमी उमेदवार आणि मोबाईलसारख्या इलेक्ट्रॉनिक साधनांच्या वापराला पायबंद घालण्यासाठी कडक तपासणी केली जाईल.
उल्हासनगरचे केंद्र ‘संवेदनशील’
उल्हासनगर येथील तक्षशिला विद्यालय परीक्षा केंद्राला यंदा ‘संवेदनशील’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या केंद्रासाठी स्वतंत्र बैठे पथक नेमण्यात आले असून, परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असेल. तसेच, गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांलगतची झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
तालुका व महापालिकानिहाय केंद्र रचना
महापालिका क्षेत्र केंद्रे तालुका केंद्रे
कल्याण-डोंबिवली ८२ अंबरनाथ १९
ठाणे ६९ मुरबाड ११
नवी मुंबई/भिवंडी ४० (प्रत्येकी) भिवंडी १०
मिरा-भाईंदर २३ शहापूर ०९
उल्हासनगर २२ कल्याण ०१