
शाळेत सोडण्याचा बहाणा करुन अल्पवयीन मुलीवर मोटारीत बलात्कार करण्याची धक्काायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा शाळकरी मुलीच्या ओळखीतील आहे. ज्ञानेश्वर सुरेश रायरीकर (वय २९, रा. पोळ काॅलनी, आपटे सोसायटी रस्ता, वारजे माळवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा शाळकरी मुलीच्या ओळखीचा आहे. त्याची पीडित मुलीच्या आईशी ओळख होती. अल्पवयीन मुलीला मोटारीतून शाळेत सोडतो, असे सांगून तिला आरोपीने नेले. कर्वेनगर भागातील डीपी रस्त्यावर त्याने मोटार थांबविली. मोटारीत त्याने मुलीला धमकावून बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास त्याने मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने याबाबतची माहिती आईला दिली. त्यानंतर आरोपीविरुद्ध बलात्कार, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गु्न्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक तरडे तपास करत आहेत. महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग पुणे शहरातील हडपसर भागात महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केल्या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सार्थक शिवाजी रुपनर (वय २२, रा. रुपनर वस्ती, लोणी काळभोर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत युवतीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन युवती महाविद्यालायत जात असताना आरोपी तिचा पाठलाग करायचा. तू मला आवडते, असे सांगून त्याने युवतीला अडवले. युवतीला तो त्रास द्यायचा. त्याच्या त्रासामुळे युवतीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक कोलेवाड तपास करत आहेत. विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार विवाहाच्या आमिषाने एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी बादशाह मशाक लाडलेकर (वय २७, रा. साडेसतरा नळी, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक एल अब्दागिरे तपास करत आहेत.