
वसमत तालुक्यातील मुर्तीजापूर सावंगी शिवारात औंढा नागनाथ पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका शेतातून तब्बल अर्धा एकर जमीनीवर लावण्यात आलेले अफूची झाडे गुरुवारी ता. १९ जप्त केली आहे. सुमारे ४ क्विंटल अफूची किंमत ७ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. हिंगोली जिल्हयातील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांनी गुन्हे शाखा व १३ ठाणेदारांची पथके स्थापन केली आहेत. या पथकाकडून अवैध वाळू वाहतूक, मटका, जुगारअड्डे यांची माहिती घेऊन छापे टाकले जात आहेत. या शिवाय शस्त्र बाळगणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी मागील चार दिवसांपासून गांजा व अफुची शेती करणाऱ्यांची माहिती घेऊन कारवाई केली जात आहे. दोन दिवसांपुर्वीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वसमत तालुक्या्तील सिरळी शिवारातून १ क्विंटल ७७ किलो अफू जप्त केला होता. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तपास सुरुच आहे. या सोबतच मुर्तीजापूर सावंगी शिवारात गुलाब राठोड याच्या शेतात अफुची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, औंढा पोलिस ठाण्याचे निरीक्षक जी. एस. राहिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक दत्ता कानगुले, अमोल इंगोले यांच्यासह ४० जणांच्या पथकाने आज सकाळीच शेताची माहिती घेण्यास सुरवात केली. पहाटे सहा ते नऊ असे तीन तास शोध मोहिमेनंतर पोलिसांना गव्हाच्या पिकात अफुची लागवड केलेली दिसून आली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक निलाभ रोहन यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, पोलिसांनी अफुची झाडे उपटून त्याचे मोजमाप केले असता अफूच्या झाडांचे वजन ४ क्विंटल भरले असून त्याची किंमत सुमारे ७ लाख रुपये असल्याचे सुत्रांनी सांगितले. पोलिसांनी गुलाब जाधव यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. सिध्देश्वर शिवारात ज्वारीच्या पिकांतून गांजा जप्त यासोबतच औंढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास भगत यांच्या पथकाने सिध्देश्वर शिवारात प्रल्हाद राठोड याच्या शेतात ज्वारीच्या पिकात पाहणी केली असता त्या ठिकाणी गांजाची झाडे असल्याचे दिसून आले. पोलिसांनी गांजाची झाटे उपटून वजन केले असता १० किलो वजन भरले असून त्याची किंमत १ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी प्रल्हाद यास ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.